केतकी चितळेची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऍट्रोसिटीच्या गुह्यात नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केलेल्या केतकी चितळे हिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. केतकी चितळे हिच्या विरोधात मार्च 2020 मध्ये ऍट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौद्ध समाजाविषयी फेसबुकवरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यामुळे 2020 मध्ये केतकी चितळे हिच्या विरोधात रबाळे पोलिसांनी ऍट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने आठ महिन्यापूर्वी केतकी चितळे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करणारी पोस्ट टाकल्यानंतर कळवा पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सुरुवातीला केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 3 दिवस पोलिस कोठडीत काढल्यानंतर तिला न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. याच कालावधीत नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने गुरुवारी केतकी चितळे हिला रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऍट्रोसिटीच्या गुह्याच्या तपासासाठी अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी तीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.