इस्कॉन मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणणा-या गुन्हे शाखेतील पोलिसांचा इस्कॉन मंदिराकडुन सन्मान
नवी मुंबई : खारघर मधील इस्कॉन मंदिरातील दानपेटया फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱया दोघा बांग्लादेशी सराईत ग्न्हेगारांना पकडणा-या नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पथकाचा इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
खारघर मध्ये उभारण्यात येत असलेल्या इस्कॉन मंदिराच्या संरक्षक भिंतीवरुन उडी टाकून आरोपी राजु शेख व आकाश खान या दोन बांग्लादेशी नागरिकांनी गत 31 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्रवेश केला होता. त्यानंतर या दोघांनी मंदिरातील तीन दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरुन नेली होती. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने या गुह्याचा तपास करताना इस्कॉन मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींची माहिती मिळवून दोघा आरोपींना ओवे गाव कॅम्प येथून अटक केली होती.
गुन्हे शाखेतील मध्यवर्ती कक्षाने केलेल्या या कामगीरीची इस्कॉन मंदिर व्यवस्थापनाने दखल घेतली आहे. तसेच सदरचा गुन्हा उघडकिस आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, हेड कॉन्स्टेबल मंगेश वाट, पोलीस नाईक, किरण राऊत, विजय खरटमोल, राहुल वाघ, लक्ष्मण कोपरकर, नितीन जगताप, प्रकाश साळुंखे या सर्वांचा इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष आणि ट्रस्टी डॉ. सुरदास यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे.