बाजारात टॉमेटोचे भाव झाले लालेलाल
नवी मुंबई-: दक्षिण भारतात अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात महाराष्ट्र राज्यातुन टोमॅटोच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून एपीएएमी भाजी मार्केटमध्ये टोमॅटोची आवक निम्यावर आल्याने दरात वाढ झाली असून ५० ते ६० प्रतिकिलोने घाऊक बाजारात विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे.
मागील वर्षी टोमॅटोच्या पिकावर तूटा आळी माशीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. तसेच मागील वर्षी याच हंगामात नऊ महिने मंदी असल्याने राज्यात आणि परराज्यातही यंदा शेतकऱ्यांनी टोमॅटोचे कमी पीक घेतले. त्यातच दक्षिण भारतात अवकाळी पावसाने टोमॅटोच्या पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे या राज्यात महाराष्ट्रातील टोमॅटोच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याने एपीएमी बाजारात आवक निम्यावर आली आहे. बाजारात सर्वसाधारण रोज २५ ते ३० गाड्या आवक होत असते. मात्र सध्या दक्षिण भारतात कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलांगना या राज्यात महाराष्ट्रातील टोमॅटोच्या मागणित वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश टोमॅटो तिकडे जात असून ५५ ते ६० टक्के आवक घटली असून १० ते १२ गाड्या आवक होत आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात आवक घटल्याने दरात वाढ होत आहे. तीन दिवसांपुर्वी ३५ ते ४० प्रतिकिलो असलेला टोमॅटो आज ५० ते ६० रु प्रतिकिलो विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे अशी माहिती एपीएमसी मधील भाजी विक्रेते तानाजी चव्हाण यांनी दिली.