श्रावणी चॅरिटेबल ट्रस्ट आणि उद्योग समुह तर्फे नवी मुंबईतील १ हजार तरुण-तरुणींना रोजगार
नवी मुंबई : नवी मुंबई शहरावर मनापासून प्रेम आणि समाजसेवेचा ध्यास असल्याने आपण सातारा येथील श्रावणी चॅरिटेबल ट्रस्ट आणि उद्योग समुह तर्फे नवी मुंबईतील तरुण-तरुणींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देण्याचे काम प्राधान्याने करणार आहे, असे श्रावणी चॅरिटेबल ट्रस्ट आणि उद्योग समुहाचे प्रमुख युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांनी जाहीर केले.
युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांनी नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी सदिच्छा भेट दिली. घनश्याम मढवी मित्र मंडळ आणि समाजसेवक गणेश खपके यांच्या तर्फे युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांच्या स्वागतासाठी घणसोली गावामध्ये माजी नगरसेवक घनश्याम मढवी यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संदीपशेठ घोरपडे यांचा सत्कार माजी नगरसेवक घनश्याम मढवी आणि समाजसेवक गणेश खपके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संदीपशेठ घोरपडे बोलत होते.
श्रावणी चॅरिटेबल ट्रस्ट आणि उद्योग समुह तर्फे नवी मुंबई मध्ये सोलर प्लेट निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पात १ हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी संदीपशेठ घोरपडे यांनी केली.
मार्च-२०२० पासून आलेल्या कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी मध्ये देशातील आणि राज्यातील मोठ- मोठे उद्योग बंद पडले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. या कठीण काळात समाजात उद्योगधंदे उभे करुन तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देण्याचे युवा उद्योजक संदीपशेठ घोरपडे यांचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार यावेळी घनश्याम मढवी यांनी काढले.
या प्रसंगी समाजसेवक सुनिल मस्कर, माजी परिवहन समिती सदस्य केशव पाटील, महेश पाटील, सर्जेराव पाटील, भिमराव गेंड, बंडूदादा भोईर, रमेश ननावरे, सागर भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.