तेजस्व करिअर ॲकॅडमी'चा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा
नवी मुंबई : घणसोली, सेक्टर-५ येथील कार्यालयात 'तेजस्व करिअर अकॅडमी'चा तृतीय वर्धापन दिन 'अकॅडमी'चे संस्थापक निलेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आणि संचालक अक्षय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी 'अकॅडमी'मध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन विषयी चर्चासत्रातून संवाद साधण्यासाठी ठाणे अँटिकरप्शन ब्युरोचे पी. आय. योगेश देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थिदशेत असताना स्वतःचे अनुभव शेअर करत यशाची पायरी कशी गाठावी त्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी, शारीरिक व्यायाम, अभ्यास या सर्वांचा समतोल राखून उत्तम लोकसेवक कसे होता येईल, या विषयावर विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक सिद्धार्थ जाधव, पत्रकार तथा 'महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना'चे नवी मुंबई संपर्कप्रमुख ( युथ) अनंतराज गायकवाड यांच्यासह अकॅडमी मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वर्धापन दिनानिमित्त निलेश ढाकणे यांच्यावर सामाजिक, राजकीय स्तरातून तसेच हितचिंतकांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमात तेजस्व करिअर अकॅडमी तर्फे सर्व शुभेच्छुक आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त करण्यात आले.