वारली पाडा मधील आदिवासींसाठी महापालिका राबवणार घरकुल योजना
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासन वारली पाडा, तुर्भे (एमआयडीसी) प्रभाग क्रमांक-६९ मधील महापालिका प्रशासनाने २००२ साली सर्वेक्षण केलेल्या एकूण १५३ आदिवासी कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवणार आहे, असे आश्वासन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी माजी शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने २००० साली एमआयडीसी कडून सी-४९५ ते सी-५०५ असे एकूण दहा भुखंड आदिवासी कुटुंबांसाठी घरकुल योजना राबवण्यासाठी हस्तांतरण केले आहेत. त्यापैकी दोन भुंखडावर एकुण ५७८० चौ.मी. जागेवर ३५ आदिवासी कुटुंबांसाठी २००३ साली घरकुल योजना राबवण्यात आली. या योजनेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते २००३ साली करण्यात आले होते. परंतु, सदर घरे लहान असल्याने आदिवासी कुटुंबानी ती घेतली नव्हती. पण, २०१७ साली तत्कालीन नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी मध्यस्थी करुन आदिवासी कुटुंबांना एका घराचे दोन घर करुन आणि घराचे क्षेत्रफळ वाढवून देण्यासाठी महापालिका प्रशासनाला भाग पाडले. तसेच आदिवासी कुटुंबानी त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेकदा मोर्चे काढून आंदोलने देखील 'वारली पाडा गांव बचाव कृती समिती'च्या नेतृत्वाखाली केली आहेत .
पण, आता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्णयामुळे घरकुल योजना पासून वंचित राहिलेल्या आदिवासी कुटुंबांना देखील घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वारली पाडा येथील आदिवासी कुटुंबांसाठी राखीव आठ भुखडांवर घरकुल योजना राबविण्यात येणार आहे.
घरकुल योजना मध्ये समाजमंदिर, अंगणवाडी, ग्रंथालय, स्मशानभुमी, खेळाचे मैदान, गार्डन, आदी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे वारली पाडा मधील आदिवासी कुटुंबानी सुरेश कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन सादर करताना माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या सोबत आदिवासी समाजाचे प्रतिनिधी कृष्णा वड, तुळसीराम चौधरी, शिवसेना उपविभाग प्रमुख दिपेश शिंदे, तुर्भे उपविभाग प्रमुख किशोर लोंढे, शिवसेना नेते केशवलाल मौर्या, देवीदास लगाडे, राजू कांबळे, हनुमान नगर उपविभाग प्रमुख अशोक बांभरे, इंदिरानगर मधील शिवसैनिक सौदागर वाघमारे, शिवसैनिक बाळकृष्ण खोपडे, आदी उपस्थित होते.