बाजारात लिंबूचे दर निम्यावर

 नवी मुंबई :- मागील तीन आठवड्यापुर्वी बाजारात लिंबुची आवक घटल्याने व मागणीत वाढ झाल्याने  दराने उच्चांकी गाठत दहा रुपयाला लिंबू असा दर झाला होता. मात्र आता घाऊक बाजारात आवक वाढल्याने प्रतिकिलोचे दर ५० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले असून आता लिंबू पाच रुपयांवर आला आहे. 

बाजारात मागील एक ते दीड महिन्यांपासून लिंबू हे सर्वसामान्यांच्या आहारातून गायब झाले होते. अवकाळी पावसाने लिंबाच्या बागांना जास्त पालवी न फुटल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला होता . त्यामुळे एपीएमसी बाजारात लिंबाची आवक कमी झाली होती. त्यात एप्रिल  महिना कडक उन्हाचा आणि आताही जास्त उष्मा असून पारा चाळिशीवर जात आहे. पारा चाळिशीवर जात असल्याने अंगाची लाही होते. त्यामुळे या काळात शीतपेय,  लिंबू सरबत यांना मागणी वाढत असल्याने  लिंबाच्या मागणीत प्रचंड वाढ होती. मात्र बाजारात आवक कमी असल्याने प्रतिकिलोचे दर शंभर दीडशे रुपयांपर्यंत गेले होते. एपीएमसी बाजारात आता ४ ते ५ गाड्या लिंबाची आवक होत आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. त्यात बाजारात ग्राहक कमी आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यात आठ ते दहा रुपयांना मिळत असलेले लिंबू आता घाऊक बाजारात ५ रुपये तर किरकोळ बाजारात ७ रुपयांपर्यंत मिळत आहेत अशी माहिती भाजी विक्रेते भारत घुले यांनी दिली..

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाजपकडून नागरिकांना विविध सोयीसुविधा