पामबीच मार्गालगचा  सायकल ट्रॅक रद्द करण्याची मागणी

नवी मुंबई-: नवी मुंबईतील सर्वात मोठा अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या पामबिच मार्गावर होत असलेल्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत सदर मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागाला मनपा आयुक्तांनी आवाहन केले आहे. तर दुसरीकडे याच अपघाती मार्गालगत मनपामार्फत पर्यावरणाचा ऱ्हास करत सायकल ट्रॅक बनवुन नागरीकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मनपाच्या या दुटप्पी भूमीकेचा  निषेध करत सदर सायकल ट्रॅक पवईच्या धर्तीवर  रद्द करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृ्ष्टीने महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी वाहतुक पोलीस विभागासमवेत तातडीने बैठक घेत सखोल चर्चा केली. एकीकडे पामबीच मार्गावर सर्वाधिक अपघात होत आहेत असे मनपा आयुक्त मान्य करत असताना दुसरी कडे याच मार्गालगत सायकल ट्रॅक बनवून सायकलस्वारांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न मनपा करीत आहे का?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण या मार्गावर भरधाव वेगाने वाहने चालतात आणि कुण्या वाहनाचे नियंत्रण सुटल्यास किंवा अपघात झाल्यास सायकल  ट्रॅक वर वाहने गेली तर मोठी हानी होऊ शकते. आणि अशा घटना या ठिकाणी नित्याने घडत असतात. शिवाय या ठिकाणी सायकल ट्रॅक साठी २६ झाडे बाधित होणार आहेत अशी माहिती मनपाने जरी दिली असली तरी दिलेल्या संख्येपेक्षा अतिरिक्त झाडे व काही खारफुटीची झाडेही बाधित होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करुन नागरीकांचा जीव धोक्यात घालणारा हा सायकल ट्रॅक मनपाने  पवईच्या धर्तीवर रद्द करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

काय आहे पवई येथील सायकल ट्रॅक प्रकरण

पर्यावरणाचे नियम डावलत  मुंबई महानगर पालिकेच्या वतीने पवई तलावालगत  सायकल आणि जॉगिंग मार्गिका  उभारण्याचे काम सुरू होते. या बांधकामाला ओमकार सुपेकर आणि अभिषेक त्रिपाठी या आयआयटी मुंबईच्या दोन विद्यार्थ्यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. न्यायालयानेही याचिकेची दखल घेत सदर प्रकल्प उच्च न्यायालयाने  बेकायदा ठरवला व प्रकल्पाच्या जागेवर यापुढे कोणतेही काम करण्यास न्यायालयाने पालिकेला मज्जाव केला असून आतापर्यंत केलेले बांधकाम तोडून जागा पूर्ववत करण्याचे आदेशही दिले.

महानगर पालिकेला पर्यावरणाचे गांभीर्य नाही

एकीकडे महानगर पालिका शहरात मियावाकी जंगल उभे करू असा डंका पिटवत पर्यावरणाबाबत सजग असल्याचा आव आणत आहे. तर दुसरीकडे पामबीच मार्गालगत सेक्टर सहा येथे जॉगिंग ट्रॅक साठी विनापरवाना वृक्ष तोड केल्याबाबत तक्रार करून देखील कारवाई करत नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या बाबतीत मनपाचे प्रेम हे बेगडी असून अजून पर्यावरणा ऱ्हास करणाऱ्या व नागरीकांचा जीव धोक्यात घालणारा सायकल ट्रॅक नकोच. - मनोज मेहेर , सामाजिक कार्यकर्ते व माजी ब प्रभाग समिती सदस्य.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यु.ई.एस. कॉलेज  ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न