पावसाळापूर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश

नवी मुंबई : 18 एप्रिल रोजी महानगरपालिकेसह नवी मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू असलेली गटारे, पदपथ, रस्त्यांची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करुन 15 मे नंतर कोणतेही बांधकाम होणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच पावसाळापूर्व नालेसफाई, गटारेसफाई, मलनि:स्सारण वाहिन्यांची सफाई ही कामेही जलद पूर्ण करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार झालेल्या कामाच्या सद्यस्थितीचा महानगरपालिकेच्या सर्व विभागांची विशेष बैठक घेत आयुक्तांनी विभागानिहाय बारकाईने आढावा घेतला.

यावर्षी मान्सूनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविलेला असून त्यानुसार संबधित सर्व विभागांनी पावसाळापूर्व कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देशित करतानाच आयुक्तांनी या कामांच्या गुणवत्तेकडेही काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सदयास्थितीत सुरु असलेली कामे  15 मे पर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश देताना त्यानंतरच्या काळात कोणतीही नवीन कामे अगदी अत्यावश्यक गरज वगळता केली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. याकरिता कार्यकारी अभियंता आणि संबधित विभागांचे सहा आयुक्त तथा विभाग  अधिकारी यांनी कामे सुरु असलेल्या ठिकाणी स्वत: पाहणी करुन कामे जलद होतील याकडे व्यक्तीश: लक्ष दयावे असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

रस्त्यांची सुरू असलेली कामेही 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशित करतानाच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर  खड्डा पडलेला चालणार नाही असे आयुक्तांनी स्पष्टपणे बजावले. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत जबाबदारी निश्चित करण्यात यावी असे स्पष्ट करीत एम.आय.डी.सी भागातील त्यांच्या अखत्यारित असलेले रस्तेही सुस्थितीत राहतील याबाबत एम.आय.डी.सी. प्रशासनाला अवगत करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या. एम.आय.डी.सी. भागातील त्यांच्या अखत्यारितील रस्ते व महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्ते यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी असे सूचित करीत आयुक्तांनी ब्रीजेस तसेच बांधकामे, पदपथांचे कॉर्नर यांच्या कोप-यावर उगवणा-या झाडांच्या रोपट्यांमुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी ती लगेच काढून टाकावीत असेही निर्देशित केले.

नाल्यातील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर पूर्ण करावे असे निर्देश देतानाच बंद गटारे सफाई करताना त्यामधून काढला जाणारा गाळ सुकण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात हे लक्षात घेतले तरी त्यानंतर तो लगेच उचलला जाईल याची काटेकोर दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. विशेषत्वाने सेक्टर-3 ऐरोली येथे सुरू असलेल्या नियोजित काटई रस्त्याच्या कामामुळे नाल्यातील प्रवाहाला अडथळा होणार नाही याची विशेष दक्षता घेत तेथील नालेसफाई 25 मे पर्यंत पूर्ण होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले.

पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्त पंपांची व्यवस्था करण्यात यावी तसेच वाशी व सीबीडी बेलापूर येथील पम्पींग स्टेशनच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात बॅकअप व्यवस्था ठेवण्याची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या.

मोठया उधाण भरतीच्या तारखांची माहिती आत्ताच महानगरपालिकेसह सर्व संबंधित प्राधिकरणांच्या अधिका-यांना देण्याचे निर्देश आपत्कालीन व्यवस्थापन विभागांना देत आयुक्तांनी ज्या ज्या वेळी अतिवृष्टीचा इशारा प्राप्त होईल त्याच्या आगाऊ सूचना संबधित सर्व यंत्रणांना त्या त्या वेळी तातडीने देण्याचे निर्देशही देण्यात आले.

सर्व विभाग कार्यालय क्षेत्रांतील दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे, नाल्यातील बांधकामे, धोकादायक इमारती यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी व स्थलांतरित करणे गरजेचे असल्यास त्याबाबतची कार्यवाही त्वरित करणेचे निर्देश विभाग अधिकारी यांस देण्यात आले. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे आधीपासूनच सतर्क राहून संभाव्य ठिकाणांची पाहणी करावी व स्थलांतरणाबाबतचा योग्य निर्णय घ्यावा असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकांना स्थलांतरित करावे लागल्यास त्यांच्या निवा-यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे निश्चित करुन त्याठिकाणी आवश्यक अन्नधान्य पुरवठयासह इतर सर्व व्यवस्था पुरेशा प्रमाणात योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

पावसाळी कालावधीत रस्त्यावरील दिवाबत्ती तसेच सिग्नल यंत्रणा सुस्थितीत राहील याची दक्षता घेणे, रस्त्यावर प्रकाशाला अडथळा होणार नाही इतपतच विद्युत पथदिव्यांजवळील झाडांच्या फांदयाची छाटणी करणे, धोकादायक झाडे तसेच विदयुत खांब यांची त्वरित पाहणी करून त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करणे, धोकादायक इमारतींची यादी जाहीर करणे, अग्निशमन व सुरक्षाविषयक उपकरणे, वाहने, बोटी सुस्थितीत असतील याची खातरजमा करणे, पावसाळी कालावधीत साथीच्या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यासाठी पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन ठेवणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना  राबविणे अशा विविध महत्वाच्या बाबीवर आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना सतर्क राहून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पावसाळापूर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. 

पावसाळी कालावधीत नागरिकांच्या सेवेसाठी विभाग कार्यालयामध्ये तसेच सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये 25 मे पासून 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू होतील याची दक्षता घेण्याचे व त्यांचे संपर्कध्वनी क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करण्याचे निर्देश देतानाच आयुक्तांनी अतिवृष्टीचा इशारा असेल तेव्हा सर्व यंत्रणा आपापल्या क्षेत्रात सज्ज असतील याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. पावसाळा कालावधीत आपले मोबाईल बंद राहणार नाहीत व लगेच उचलले जातील याची विशेष दक्षता घेण्याचेही आयुक्तांनी या विशेष बैठकीप्रसंगी अधिका-यांना सूचित केले.

पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशाप्रकारे पावसाळापूर्व कार्यवाही करणे व पावसाळा कालावधीतही अचानक उद्भवणा-या अडचणी दूर करण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज राहील याकडे काटेकोर लक्ष देऊ या असे अधिकारीवर्गास सूचित करतानाच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कालावधीत नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही अडचणींबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाशी 1800222309 / 1800222310 हया टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 

 
 
 
Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

कडक उन्हाचा बटाट्याच्या उत्पादनाला फटका, आवक घटल्याने दरात वाढ