अखेर सिडकोचे जप्त  केलेले संगणक, खुर्च्या, टेबल, पंख्यांची न्यायालयाने केली सुटका 

नवी मुंबई : संपादित जमिनीच्या वाढीव नुकसान भरपाईपोटीची सुमारे २६ कोटीची रक्कम सिडकोने अखेर न्यायालयात जमा केल्यानंतर अलिबाग येथील सह दिवाणी न्यायालयाने सिडकोचे जप्त केलेले शेकडो संगणक, खुर्च्या, कपाटे, पंखे, टेबल, फॅक्स मशीन आदी मालमत्तांची सुटका केली. त्यामुळे गेले महिनाभर संगणक, खुर्च्या, टेबल व पंख्या अभावी सिडको कर्मचा-यांमध्ये उडालेला गोंधळ थांबला आहे. गत महिनाभर सिडको अधिकारी-कर्मचारी जागेवर सापडत नसल्याने नागरिकांची कामे देखील खोळंबली होती.  

उरणच्या करळ गावातील ओंकार ठाकूर यांची ३४ गुंठे जमीन संपादनापोटी वाढीव नुकसान भरपाई म्हणून १ कोटी ५४ लाख तर वडघर येथील धाया माया मुंडकर यांना सुमारे साडेचार एकर जमीन संपादना पोटी वाढीव नुकसान भरपाईची सुमारे २६ कोटी इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने सिडकोस दिले होते. मात्र सदर रक्कमेचा भरणा सिडकोने न केल्याने न्यायालयाने सिडकोच्या मालमत्तेवर दोनदा टाच आणली. मालमत्ता जप्तीची नोटीस बजावून देखील सिडको व्यवस्थापनाकडून भूधारकांना वेळेत नुकसान भरपाई दिली जात नसल्याने अखेर न्यायालयाने जप्तीच्या कारवाईची अंमलबजावणी केली होती.  

या कारवाई अंतर्गत सिडको कार्यालयातील २ हजार संगणक, ३ हजार खुर्च्या, ५०० कपाटे, ५०० पंखे जप्त करण्याचे आदेश सह दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अलिबाग यांनी दिले होते. मात्र कारवाई दरम्यान सिडको अधिकारी-कर्मचा-यांनी सिडकोतील दालने कुलुप बंद करण्यास सुरुवात केल्याने न्यायालयाच्या बेलिफने मिळेल तितके साहित्य जप्त करुन न्यायालयात जमा केले होते. इतक्यावरच न थांबता सिडकोचे बँक खाते गोठवून भूधारकाचे पैसे वसूल करण्यासाठी भूधारकाचे वकील ऍड. चंद्रशेखर वाडकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर जप्ती वॉरंट बजावलेल्या या दोन्ही प्रकरणात बाळकृष्ण ठाकूर यांना वाढीव नुकसान भरपाईपोटी सिडकोने १ कोटी ६० लाख १५ हजार ९४६ रुपये तर धाया माया मुंडकर प्रकरणात सिडकोने २४ कोटी ५३ लाख ३२ हजार ५५९ रुपये गत ५ मे रोजी न्यालयात जमा केले. इतकेच नव्हे तर वाढीव नुकसान भरपाईपोटीच्या १३० प्रकरणात सिडकोने चालू महिन्यात तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये न्यायालयात जमा केल्याची माहिती सिडको सुत्रांनी दिली.   

गेली अनेक वर्षे वाढीव नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडकोच्या दारात खेटे मारत होते. मात्र सिडको अधिकारी व कर्मचा-यांच्या उदासिनतेमुळे या शेतक-यांना प्रत्येक वेळेस खाली हात परतावे लागत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची रक्कम मिळावी म्हणून सिडकोविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या सिडको अधिकारी-कर्मचा-यांना सिडकोवर जप्तीची कारवाई झाल्यानंतर उशीरा का होईना शहाणपण सुचलं व त्यांनी वाढीव नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे न्यायालयाने सिडकोच्या जफ्त केलेल्या मालमत्तेची सुटका केल्याने सिडको अधिकारी-कर्मचा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भावे नाट्यगृह नूतनीकरणाचा पैसा कुठे मुरला ?