भावे नाट्यगृह नूतनीकरणाचा पैसा कुठे मुरला ?

 नवी मुंबई-: नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने १६ कोटी रुपये खर्च करून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र सदर खर्च करून देखील नाट्यगृहाच्या बाह्य भागात रंगावली खेरीज कुठलीही कामे न केल्याने या भागाची  आजही  दुरावस्था कायम आहे. त्यामुळे मनपाने खर्च केलेले करोडो रुपये नक्की कुठे मुरले ? असा  सवाल आता उपस्थित केला जात आहे.
१९९६ साली सिडकोच्या माध्यमातून वाशी बस आगार समोर  १३ कोटी खर्च करून भावे नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली . त्यानंतर सिडकोने सदर नाट्यगृह नवी मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरण केले. २२ वर्ष अविरत नाट्यगृह चालवल्यानंतर २०१८ साली नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम नवी  मुंबई महानगर पालिकेने हाती घेतले. सुरूवातीला साडेअकरा कोटी खर्च अपेक्षित असताना त्यात आणखी साडेचार कोटीची वाढ करण्यात आली. मात्र १६ कोटी खर्च करुन  नाट्यगृहाच्या आतील भागातच काम करण्यात आले. त्यात आसन  व्यवस्था, सिलिंग, विद्युतिकरण आदी बाबींवर भर दिला. मात्र नाट्यगृहाचा मुख्य स्टेज तसाच ठेऊन त्याला पॉलिशचा  मुलामा लावण्यात आला. तर बाह्यभागात आजही खिडक्यांच्या काचा, लोखंडी खांब जुनेच असून गंजलेले आहेत. तसेच प्रवेश केल्यानंतर व पहिल्या माळ्यावरील खांब व नाट्यगृहाच्या बाह्य भिंतीला गालाला लाली लावल्यागत रंग लावून दिले आहे. तर नाट्यगृह  बाह्य आवारातील स्थापत्य विभागाशी निगडित काहीही कामे न केल्याने या भागातील  लाद्या , पायऱ्या , पार्किंग जागेची पुरती दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने १६  कोटी रुपये खर्च केलेले पैसे कुठे मुरले ? असा सवाल सध्या भावे नाट्यगृहाच्या कामावरून उपस्थित केला जात असून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
 
भावे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाखाली मनपाने १७ कोटी खर्च केले आहेत असे नाट्यगुहाच्या सध्याच्या परिस्थितीवरून वाटत नाही. त्यामुळे मनपाने केलेल्या कामाची आणि खर्चाची अचूक आकडेवारी मिळावी  म्हणून आम्ही त्रयस्थ संस्थेकडुन फ्लेक्सीबल ऑडिट करण्याची मागणी  मनपा आयुक्त यांच्या कडे करणार आहोत.
- बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष पर्यावरण सेवा भावी संस्था, नवी मुंबई

भावे नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामातील स्थापत्य विभागाशी निगडीत काही कामे अजून बाकी आहेत. त्या कामांना लवकरच सुरूवात करून ती पूर्ण केली जातील.
- संजय देसाई,  शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तारीख जाहीर करणार नाही मनात येईल त्या दिवशी सिडको कार्यालयात घुसून आंदोलन- आमदार प्रशांत ठाकूर