पाच वेळा तोडलेली अनधिकृत इमारत पुन्हा थाटात उभी
नवी मुंबई--:कोपरखैरणे विभागातील खैरणे गावात पाच वेळा निष्कासनाची काईवाई केलेली इमारत अधिकाऱ्यांच्या साटेलोटेनी पुन्हा दिमाखात उभी राहिल्याने अतिक्रमण विभागाच्या कार्यशैलीवर शंका निर्माण होत असून सदर इमारतीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार फिरोज बगदादी यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी मनपा आयुक्तांनी वेळो वेळी आदेश काढले आहेत. मात्र सदर आदेशाला केराची टोपली दाखवत भूमाफियांकडून अतिक्रमण अधिकारीवर्गाच्या संगनमताने शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधमाने सुरू आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांचे आदेश हे कृती करण्यासाठी दिले गेले आहेत का ?अधिकारी वर्गाचे खिसे गरम करण्यासाठी दिले आहेत?असा सवाल कोपरखैरणे अतिक्रमण विभागाच्या कार्यशैलीवरून आता उपस्थित केला जात आहे.या विभागा अंतर्गत खैरणे गावातील ईबा पटेल यांनी अनधिकृत बांधकाम केले होते.आणि या बांधकामावर मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने याआधी पाच वेळा तोडक कारवाई केली आहे. मात्र कोपरखैरणे विभागाचे तत्कालीन विभाग अधिकारी यांनी केलेल्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे ही इमारत पुन्हा उभी राहिली. त्यामुळे सदर इमारतीवर कारवाई करावी म्हणून तक्रारदार फिरोज बगदादी यांनी तक्रार केल्यानंतर कोपरखैरणे विभागामार्फत ईबा पटेल यांना नोटीस देऊन एम आर टी पी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याच नोटीसीचा आधार घेत ईबा पटेल यांनी स्थगितीसाठी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयात यावर आता सुनावणी सुरू आहे. मात्र पाच वेळा कारवाई केलेली इमारत पुन्हा उभी राहिली तोपर्यत कोपरखैरणे अतिक्रमण विभाग काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे.
खैरणे गावातील इमारतीच्या बांधकाम धारकावर गुन्हा दाखल असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने स्थगिती उठवताच सदर इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल.
प्रशांत गावडे,
विभाग अधिकारी, कोपरखैरणे विभाग.
खैरणे गावातील ईबा पटेल यांच्या अनधिकृत इमारतीबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. तर सदर इमारत धारकावर गुन्हा दाखल असून इमारतीवर वास्तव्य करणाऱ्यांना देखील सहआरोपी करता यावे म्हणून त्या इमारतीचा पंचनामा करून सदर ठिकाणी अनधिकृत इमारत असल्याबाबत फलक लावण्यात यावा अशा सूचना विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अभय जाधव,
विधी अधिकारी, नवी मुंबई महानगर पालिका.