पावणे एमआयडीसीतील आगीत चार कंपन्या जळुन खाक
नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि.या रबर बनवणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 18 तासाच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास आटोक्यात आणली. मात्र या आगीत वेस्ट कोस्ट पॉलिकेम कंपनीतील मॅनेजर आणि अभियंता या दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी बाहेर काढले. या आगीत चार कंपन्या जळुन खाक झाल्या असून या कंपन्यांचे कोटयावधीचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आगी मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावणे एमआयडीसीतील वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि.या रबर बनवणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. सदर कंपनीत मोठया प्रमाणात केमिकल व रबर असल्याने आग काही वेळातच संपुर्ण कंपनीत पसरली. त्यानंतर सदरची आग बाजुच्या मे.हिंद इलास्टोमर्स या रबर बनविणाऱया कंपनीसह इतर दोन कंपन्यामध्ये पसरली. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दल दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील कंपनीत अडकुन पडलेल्या तीन कामगारांना बाहेर काढुन त्यांना महापलिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दोघेजण आत अडकून पडले होते.
सदर कंपनीत मोठया प्रमाणात रबर असल्याने लागलेल्या आगीत मोठया प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना येथील आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, सीबीडी येथील 12 तसेच सिडकोच्या उलवे, खारघर व ओएनजीसी, ठाणे महापालिका अग्निशमनदलाचे मिळून एकुण 25 फायर टेंडर आग विझविण्याचे काम अहोरात्र करत होते.
फायर टेंडरसह आगीवर नियंत्रण मिळविण्याबरोबरच फोमच्या सहाय्याने देखील आग रोखण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत होता. त्यासाठी फोमच्या 200 ड्रमचा वापर करुन शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदर आगीचा भडका पुन्हा उडू नये म्हणून घटनास्थळी कुलिंगचे काम शनिवारी उशिरापर्यंत सुरु होते.
या आगीत मे.वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लिमिटेड या कंपनीचे मॅनेजर एन.एस.नायर (65) हे कंपनीच्या टेरेसवर मृतावस्थेत आढळुन आले. त्यांचा आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात गुदमरुन मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे. तर याच कंपनीचे अभियंता निखील पाशिलकर (25) हे दुस-या मजल्यावर बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी बाहेर काढले.
या आगीत वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि.तसेच हिंद इलास्टोमर्स प्रा.लि. व इतर दोन अशा चार कंपन्या पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तसेच या आगीची झळ आजुबाजुच्या इतर चार ते पाच कंपन्यांना देखील बसली असून त्यांचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आगीत कोटयावधीची मालमत्ता जळुन खाक झाल्याचे बोलले जाते.