खारघर: खारघर मधील पाणी समस्या मे अखेर पर्यंत दूर होईल असे आश्वासन सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडून आंदोलन कर्त्यांना देण्यात आले.
खारघर मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सिडकोकडे पत्र व्यवहार आणि मोर्चे काढूनही पाणी समस्या सुटत नसल्यामुळे खारघर भाजपच्या वतीने सेक्टर 14 मध्ये सिडकोच्या सुरु असलेले गृह संकुलाचे बांधकाम रोखण्यासाठी भाजपच्या वतीने गृह संकुलवार आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तसेच सर्व नागरसेवक, पदाधिकारी आणि काही नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन कर्त्यांनी सेक्टर चौदा मध्ये सुरु असलेले बांधकाम रोखण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवले होते. आंदोलन दरम्यान सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नाणिक चोइथानी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात चर्चा झाली यावेळी सिडकोने मे अखेर पर्यंत खारघर मधील पाणी समस्या दूर होईल असे आश्वासन सिडकोकडून दिल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.