नवी मुंबईतील पोलीस बिट चौक्या धूळखात पडून
नवी मुंबई-: शहरारील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी, सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन व नागरिकांना तात्काळ तक्रार करता यावी या हेतूने नवी मुबंईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी शहारातील प्रत्येक सेक्टर गावगावात पोलीस बिट चौक्यांची उभारणी केली होती. मात्र जावेद अहमद यांची बदली होताच या चौक्यांकडे पोलीस प्रशासनाने पुरते दुर्लक्ष झाले असून या चौक्या आज धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे या चौक्या पुन्हा सुरू करण्यात याव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे.मात्र वाढत्या नागरीकरणासोबतच या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण ही वाढू लागले.त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी २०१४ मध्ये प्रत्येक प्रभागात पोलीस बिट चौक्या उभारल्या होत्या. आणि या चौक्यात किमान दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध असतील अशी तजविज केली होती.जेणे करून कोणी तक्रारदार आल्यास त्यांची त्याच ठिकाणी तक्रार नोंदवली जावी जेणेकरून तक्रारदारांची पोलिस स्टेशन पर्यतची पायपीट थांबावी.जावेद अहमद जो पर्यंत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी होते तोवर या चौक्या व्यवस्थित सुरु होत्या. मात्र जशी अहमद यांची बदली झाली तशी नवी मुंबई पोलिसांनी या चौक्यांकडे पाठ फिरवली.परिणामी आज बऱ्याच चौक्या बंद असून धूळखात पडल्या आहेत. आज शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट आहे. जर या चौक्या पूर्ववंत सुरू राहिल्या तर बऱ्याच अंशी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसेल.त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व नागरीकांना तात्काळ फिर्याद नोंदविण्याकरिता या बिट चौक्या खुल्या ठेवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या शहरात मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यामुळे या बिट चौक्या पुन्हा सुरु केल्या तर अशा चोरांवर पोलिसांचा धाक ही राहील आणि काही अनुचित प्रकार घडला तर बीटजवळ असल्याने पोलीस ठाण्याची पायपीट थांबेल. - सत्यवान गायकवाड, समाजिक कार्यकर्ते.