कोपरखैरणेतील वाहतूक कोंडी फुटणार
नवी मुंबई-:कोपरखैरणे भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कोपरी नाल्यावर रेल्वे रुळालगत आणखी एका पुलाची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी सवापाच कोटी खर्च करण्यात येणार आहे.
कोपरखैरणे भागात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने वाहनांच्या संख्येत ही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याठिकाणी १९९९ -२००० साली महापालिकेच्या वतीने कोपरी नाल्यावर पामबीच मार्गाला जोडण्यासाठी पुलाची निर्मीती केली होती. मात्र हा रस्ता सोयीचा असल्याने या मार्गावर आता सर्वाधिक वाहतुक कोंडी होत असते. कारण या ठिकाणी वाशी व ठाणेकडे ये जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तीही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने कोपरी नाल्यावर खैरणे गाव ते कोपरी तलाव यामार्गावर रेल्वे रुळालगत आणखी एका पूलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वापाच कोटी खर्च अपेक्षित असून त्याची निविदा प्रकिया पूर्ण झाली असून लवकरच या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. अशी माहिती कोपरखैरणे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय राऊत यांनी दिली आहे.तर सदर पुल तयार झाल्यानंतर खैरणेतुन थेट एपीएमसी मार्केटला प्रवास करता येईल.