आरपीआयने दिले मशिदिंना संरक्षण
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठविल्याने मनसेचे पदाधिका-यांनी मशिदी विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुर्भेस्टोर येथील 3 माशिदिना संरक्षण दिले. तसेच मिठाई व गुलाबाचे पुष्प वाटप करून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तुर्भेस्टोर येथील 3 मशिदीना संरक्षण देत, मुस्लिम समाज के सन्मान मे आरपीआय मैदान मे, हम सब एक हे, हिंदू- मुस्लिम भाई भाई अशा घोषणा देत मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल व मिठाई देऊन सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी धार्मिक-जातीय तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रिपब्लिकन पक्ष जशेस तसे उत्तर देईल असा इशारा दिला.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते आलम बाबा, पक्ष निरीक्षक बाळासाहेब मिरजे, जेष्ठ उपाध्यक्ष नागेश कांबळे, युवा नेते यशपाल ओहोळ, शिलाताई बोदडे, रमेश बोदडे, आयुब खान इमरान शेख, अभिमान जगताप, विनोद वानखेडे, संजू कांबळे, फयाज शेख, मंगेश शिंदे, सिद्धार्थ शिरसाट, राहुल साबळे, विनोद दुपरगावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.