महाराष्ट्र भवन भूमी पूजनाचा मुहूर्त कधी ?
नवी मुंबई :- सिडकोने वाशी रेल्वे स्थानक जवळ महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी १९९८ पासून वाशी सेक्टर ३० येथे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र निधी अभावी या भवनाचे काम रखडले होते. मात्र आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या पाठपूराव्यामुळे या भवनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या भवनाचे भुमीपुजन पार पडेल अशी आशा नवी मुंबईकरांना होती. मात्र यंदाचाही मुहूर्त हुकल्याने या भवनाची वीट कधी रचणार ? असा सवाल नवी मुंबईकर करत आहेत.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानक परिसरात 'सर्व राज्य समभाव' अशी ओळख देण्यासाठी सर्व राज्यांना त्यांचे राज्य भवन उभारण्यासाठी भूखंड देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक राज्याला आपला सांस्कृतिक ठेवा प्रातिनिधिक स्वरूपात जपता यावा, यासाठी इथे त्या त्या राज्यांच्या भवनांची उभारणी केली आहे. प्रत्येक राज्यांच्या नावाचे भवन येथे दिमाखात उभे आहे. मात्र याच ठिकाणी महाराष्ट्र भवनासाठी दिलेल्या भूखंडावर मागील कित्येक वर्षे एक वीटही रचली नाही. त्यामुळे या जागी महाराष्ट्र भवनाची निर्मीती करावी म्हणून काही राजकीय पक्षानी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आंदोलने करून प्रतित्मक भुमीपूजन करत सिडको आणि शासनाचे वाभाडे काढले आहेत. हे भवन उभे राहावे, यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी २०१४ पासून पाठपुरावा सुरू केला होता. या वास्तूच्या उभारणीच्या खर्चाचा मुद्दा आला होता. आमदार म्हात्रे यांनी सिडको तसेच सरकारच्या संबंधित आधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडे हा विषय वारंवार मांडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्र भवना साठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार,राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात भवनाच्या उभारणीसाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे या भवनाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.या भूखंडा शेजारीच, उत्तर प्रदेश भवन, केरळ भवन, आसाम भवन, ओरिसा भवन यांसारख्या अनेक राज्यांच्या वास्तू दिमाखात उभारल्या गेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातच नवी मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्र भवनाच्या इमारतीसाठी साधा पायाही खणला गेला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्याने यंदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या भवनाचे भूमीपूजन पार पडेल अशी आशा होती. मात्र यंदाचाही मुहूर्त हुकल्यामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
------------------------------------------------------
आज महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र भवना शेजारी इतर राज्यांचे भवन दिमाखात उभे आहेत. मात्र महाराष्ट्र भवन अजून उभे राहत नाही ही खेदाची बाब आहे.त्यामुळे राज्य शासनाने मंजूर केलेला निधी तात्काळ रिलीज करावा जेणे करून या भवनाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. - निलेश पालेकर, सामाजिक कार्यकर्ते.