खारघर सेक्टर दहा मधील पथदिव्यांची दुरुस्ती, नागरिक समाधानी.
खारघर : सिडकोच्या विद्युत विभागाकडून खारघर सेक्टर दहा मधील बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर सेक्टर दहा विकसित करताना सिडकोने रस्त्याचे सुशोभित करताना पदपथावर पथदिव्यांची सोय केली होती. सेक्टर दहा मध्ये गेल्या पाच वर्षात मॉल, शोरूम तसेच स्टेट बँक आणि बँक ऑफ इंडिया आदी शाखा सुरू झाल्यामुळे परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र रस्त्यावर अनेक पथदिवे बंद असल्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असे, त्यात अंधारात भटकी कुत्री दुचाकी चालकाच्या मागे लागत असे, सेक्टर दहा मधील बहुतांश पथदिवे बंद असल्याची माहिती पनवेल पालिका स्थायी समिती सभापती आणि स्थानिक नगरसेवक ऍड नरेश ठाकूर याना माहिती प्राप्त होताच सिडकोकडे पत्रव्यवहार तसेच अधिकाऱ्यांची भेट घेवून तातडीने पथदिवे सुरू करावे अशी मागणी केल्यानंतर सिडकोच्या विद्युत विभागाकडून पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. नरेश ठाकूर म्हणाले जवळपास पंधरा ते वीस पथदिवे बंद होते. त्या ठिकाणी नवीन दिवे लावले जात असून इतर सर्व पथदिव्यांची पाहणी विद्युत विभागाकडून केली जाणार आहे. तसेच खारघर सेक्टर दहा वसाहत आणि कोपरा गावातील पथदिवे पावसाळ्या पूर्वी पाहणी करून बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावे अशी सूचना सिडको तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आली आहे.