नाका कामगारांसाठी प्रभात ट्रस्ट ठरत आहे प्रकाशाचा किरण
नवी मुंबई-: १ मे महाराष्ट्र राज्यात कामगार दिन म्हणून शुभेच्छा देत साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्र राज्यात आजही हातावर पोट असणाऱ्या नाका कामगारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. रोजची कमाई आणि रोजचा उदरनिर्वाह हाच काय तो त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र. मात्र आजही अनेक कामगार शारीरिक व्याधींनी ग्रासलेले असून त्यात डोळ्यांची समस्या प्रामुख्याने असलेला घटक आहे. मात्र याच घटकाला मध्यवर्ती घेऊन प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था सन २०११ पासून कार्यरत असुन दैनंदिन रोजंदारी कामगारांसाठी डोळे तपासणीचे काम नित्याने करत असल्याने ती प्रकाशाचा किरण ठरत आहे.
प्रभात ट्रस्ट ही जगातील पहिल्या सौर आधारित फिरत्या नेत्रालयाद्वारे नवी मुंबईतील नाका कामगारांना मोफत चष्मा देऊन नेत्र सेवा नियमितपणे उपलब्ध करुन देते. रोज सकाळी आठ ते दहा या वेळेत नवी मुंबईतील विविध नाक्यांवर सौरऊर्जेवर आधारित अद्यावत उपकरणांच्या सहाय्याने नेत्र सेवा प्रदान करण्यात येते यामध्ये टेलीमेडिसीनचा ही वापर केला जातो. याचवेळी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवू इच्छीणाऱ्यांकडून प्राप्त सहयोग निधीतून मोफत चष्मा वाटप करण्यात येते. डोळ्यांना आघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता तसेच डोळ्यांना आघात झाल्यास करावयाचा प्रथम उपचार याचे मार्गदर्शन केले जाते. डोळ्यांच्या आजारांवर औषध उपचार व गरजेनुसार शस्त्रक्रियाही केल्या जातात. गत तीन वर्षांत प्रकाश रथाद्वारे पाच हजाराहून अधिक नाका कामगारांची नेत्रतपासणी करून हजारो कामगारांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे, तसेच आघात झाल्यामुळे अंधत्व आलेल्या कामगारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नव दृष्टी प्राप्त करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने नाका कामगारांसाठी प्रकाशाचा किरण ठरला आहे. नाका कामगारांना डोळ्यांसह इतरही आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहेत हे लक्षात येताच प्रभात ट्रस्ट द्वारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली येथील समाज मंदिरामध्ये कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. विविध कंपन्यांमध्ये कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते त्याच धर्तीवर या उपक्रमांतर्गत दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे बीपी, रक्त गट, पल्स, ऑक्सिजनचे प्रमाण, शरीराचे तापमान, सामान्य परीक्षा, ब्लड शुगर टेस्ट, ईसीजी आणि ऑडिओमॅट्रि सारख्या मूलभूत आरोग्याच्या तपासण्या व औषध उपचार मोफत केले जातात. त्यामुळे नवी मुंबईतील गरजू नाकाकामगारांनी व नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभात ट्रस्टचे अध्यक्ष नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रशांत थोरात यांनी केले आहे.