शालेय विद्यार्थाना लवकरच शिष्यवृत्ती मिळणार
नवी मुंबई-: शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती वितरणाला अखेर मंजुरी मिळाली असून टप्प्याटप्प्याने या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार असून ३७ हजार ८२४ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून एकूण २७ कोटी रुपये वाटप होणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेकडून दरवर्षी शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.आणि त्यासाठी महापालिका अर्ज मागवते. मात्र करोनामुळे शिष्यवृत्ती वितरणाला ब्रेक लागला होता. नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती करिता सप्टेंबर २०२१पर्यत पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिली होती.त्यासाठी एकूण ३७ हजार ८२४ अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र सदर शिष्यवृत्ती देण्यास मनपाकडुन विलंब होत असल्याने ही शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे सदर शिष्यवृत्ती वाटपास आता मनपाने मंजुरी दिली आहे..याआधी २०१६-१७ मध्ये या शिष्यवृत्ती योजनेसाठी २ कोटी,३ कोटी खर्च होत होता,तर सन २०१७ -१८ मध्ये १४ हजार लाभार्थ्यांना ९ कोटी खर्च झाला तर सन २०१८-१९ मध्ये यात दुपट्टीने वाढ होऊन २८,४४३ विद्यार्थी पात्र ठरले होते आणि त्यांना एकूण १९ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपये वाटप करण्यात आले होते.तर २०१९ मध्ये खुल्या, इतर मागासवर्गीय प्रवर्गाला ४ लाख वार्षिक उत्पन्न अट होती ती आता शिथिल करून वार्षिक ८ लाखावर केली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या अर्जात आणखी वाढ होत आहे. सन २०१९-२० मध्ये ३० हजार अर्ज आले होते त्यासाठी एकूण २३ कोटी वाटप करण्यात आले होते. सन २०२०-२१ मध्ये ३७ हजार ८२४ अर्ज आले असून २७ कोटी खर्च येणार आहे.आणि ही शिष्यवृत्ती लवकरच पालकांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती समाज विकास अधिकाऱ्यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून २०१५ पासून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. मात्र सन २०२०-२१ ची शिष्यवृत्ती अजून पर्यत देण्यात आली नाही. त्यामुळे ही रखडलेली शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी अशी मागणी नवी मुंबई शिवसेना महिला संघटक शीतल सूर्यकांत कचरे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली हाेती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांशी चर्चा करून २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होण्यास सुरुवात होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले हाेते.