अशुद्ध बर्फाच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ?
नवी मुंबई :- सूर्य सध्या आकाशातुन आग ओकत असल्याने शरीराची लाही लाही होत आहे. त्यामुळे शरीराची लाही कमी करण्यासाठी व आपली तृष्णा भागवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शीतपेयांना पसंती देत आहे. मात्र हे शीतपेय बनवण्यासाठी अशुद्ध बर्फ़ाचा वापर होत असतो. त्यामुळे नागरीकांना पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात असते असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
उन्हाळ्याचा जाेर चढताच नागरीकांचा ओढा शितपेय सेवनाकडे वाढत असतो. त्यामुळे शहरात उसाचा रस, फळांचा रस, गोळा सरबत अशा शीतपेय बनवणाऱ्यांचे व्यवसाय जागो जागी दिसत असतात. मात्र यासाऱ्या ठिकाणी ज्या बर्फाचा वापर होतो तो बर्फ अशुद्ध असल्याचे वारंवार दिसून येत आहे. याठिकाणी फुटपाथावर बारदान (पोते) झाकून ठेवलेला बर्फ वापरला जातो. मात्र, या बर्फाचा दर्जा तपासला गेला आहे की नाही? याची नागरिकांना कल्पना नसते, उसाचे रस विक्रेते, विविध रंग टाकून आकर्षक बर्फ गोळा विकणारे, फळांचा रस विकणारे ज्यूस सेंटर, उन्हाळ्यात जागोजागी माठ घेऊन लस्सी आणि ताक विकणारे हा बर्फ घेत असतात. मात्र अशा अशुद्ध बर्फ़ाच्या सेवनाने ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंचा संसर्ग होत असतो, दूषित पाण्याने जे रोग होतात, तेच रोग उघडय़ावरील बर्फ खाल्ल्याने होतात. या अशुद्ध बर्फ़ाच्या सेवनाने विषमज्वर, कॉलरा, अन्नातून विषबाधा, मेटल पॉइझनिंग, अमेबिया, उलटय़ा, कावीळ, अतिसार, हगवण असे आजार होऊ शकतात. असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.