मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱया खारघरमधील ओश्यानिक स्पावर छापा

नवी मुंबई : स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱया खारघर सेक्टर-7 मधील ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी सायंकाळी छापा मारुन मसाज पार्लर चालक मालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यसायासाठी ठेवण्यात आलेल्या 5 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली आहे.   

खारघर सेक्टर-7 मधील रावेची हाईट्स इमारतीतील ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनमध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनमध्ये मंगळवारी सायंकाळी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पामध्ये बॉडी मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या 5 महिलांकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळुन आले.  

यावेळी पोलिसांनी सदर महिलांकडे केलेल्या चौकशीत स्पा चालक व मालक हे बॉडी मसाजच्या बहाण्याने ग्राहकांसोबत वेश्यागमन करण्यास सांगत असल्याचे सांगितले. तसेच वेश्यागमन केल्यानंतर ग्राहकांकडून घेतलेल्या 3500 मधून 1 हजार रुपये वेश्यागमन करणाऱया महिलेला तसेच उर्वरीत रक्कमेतील 1500 रुपये मॅनेजर तर 1 हजार रुपये मालक घेत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर स्पा ऍन्ड सलुनचा चालक भिमाराम माळी व स्पा मालक विमल परमार या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले. तसेच ज्या महिलांच्या माध्यमातून या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात होता, त्या पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शालेय विद्यार्थाना लवकरच शिष्यवृत्ती  मिळणार