आंबा पेट्यांनी केली रस्त्याची अडवणूक, फळ बाजारात वाहतूक कोंडी
नवी मुंबई-:वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात हापुस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र बाजार आवारात काही घटकांकडुन एपीएमसी प्रशासनाच्या संगनमताने रस्तावरच विक्रीसाठी आंबा पेट्या ठेवल्या जात असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एलिएमसी प्रशासनाने अशा प्रकारे रस्त्यावर पेट्या ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून वाशीच्या एपीएमसी बाजार समितिकडे पाहिले जाते. त्यामुळे याठिकाणी खरेदीसाठी रोज हजारोंच्या संख्येने शेतमाल घेऊन वाहने येत असतात. यातील सर्वाधिक वाहने ही भाजीपाला आणि फळ बाजारात येत असतात. सध्या बाजारात हापुस आंब्याच्या हंगामाने जोर धरला असल्याने वाशीच्या एपीएमसी फळ बाजारात मागील तीन चार दिवसांपासुन हापुस आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हापुस आंब्याची मोठी उलाढाल बाजार आवारात सुरु आहे. मात्र बाजार आवारात काही घटकांकडुन भर रस्त्यावर आंबा साठवणुक करून विक्री करण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. एलिएमसी प्रशासन सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत असून बेशिस्त पार्क वाहनांना जामर लावण्याचे काम करते. मात्र ज्या रस्त्यावर आंबा पेट्या ठेऊन वाहतुक कोंडी करणाऱ्या आंबा विक्रेत्यांना मात्र अभय दिले जात आहे. त्यामुळे हा सारा प्रकार एपीएमसी प्रशासनाच्या संगनमताने सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एलिएमसी प्रशासनाने अशा प्रकारे रस्त्यावर पेट्या ठेऊन अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
भाजी,फळ मार्केट बाहेर वाहतूक पोलिसांना करावी लागली कसरत
वाशीच्या फळ बाजार आवारात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम बाजार बाहेरील रस्त्यावर देखील दिसून आला. कारण बाजार आवाराच्यां बाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन ती नियंत्रण करण्यासाठी एपीएमसी वाहतूक पोलिसांच्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांना दुपार पर्यत कसरत करावी लागली.
एपीएमसी फळ बाजार आवारात जर कुणी रस्त्यावर आंबा पेट्या ठेऊन अडवणूक केली असेल तर त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल. - संगीता अडांगले. उपसचीव, फळ बाजार समिती.