एपीएमसीतील मोकळ्या भुखंडावर अतिक्रमण वाढले
नवी मुंबई-: एपीएमसी दाना बाजारच्या पूर्वला सिडकोने एलिएमसीसाठी राखीव ठेवलेल्या भुखंडावर दिवसेंदिवस अतिक्रमण होऊन अनैतिक प्रकारात वाढ होत आहे आणि याचा नाहक त्रास सेक्टर २६ मधील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याने या भुखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागाणी आता होत आहे.
सिडकोच्या माध्यमातून वाशी, सेक्टर १९ एफमध्ये भुखंड क्रंमांक १ हा एपीएमसी निगडित कामाकरिता आरक्षित ठेवला आहे. मात्र मागील कित्येक वर्षापासून सदर भुखंड मोकळा असल्याने त्यावर भूमाफियांकडून दिवसेंदिवस अतिक्रमण केले जात आहे. याआधी याठिकाणी झोपड्या बांधून विकल्या जात असल्याच्या व त्यांच्या कडुन पाण्याचे पैसे उकळले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अल्पावधीतच मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. झोपडपट्टी वाढल्याने रात्री अपरात्री जुगाराचे डाव रंगत असुन हे ठिकाण अंमली पदार्थ विक्रेत्यांचे आश्रय स्थान बनल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास सेक्टर २६ मधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. तर आता या भुखंडावर लाकडी पेट्या बनवण्याचा कारखाना तसेच अवैध वाहन पार्किंग सुरु करुन गॅरेज चालवले जात आहे. मात्र सदर भुखंडावरील अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करुन भुखंड अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी सेक्टर २६ मधील रहिवाशांकडुन जोर धरू लागली आहे.