कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही त्वरित करा - उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे
ठाणे - कोविड कालावधीत एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्याठाणे जिल्ह्यातील एकूण 1414 बालकांपैकी 880 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला असून 534 बालकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. या बालकांनाही बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही त्वरीत करावी. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे दिले.
कोवीड काळात पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मंगेश देशपांडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, तहसीलदार युवराज बांगर, डॉ. अनुराधा बाबर, स्नेहल पुण्यार्थी, प्रशांत गवाणकर आदी यावेळी उपस्थित होते.
कोविड कालावधीत दोन्ही पालक गमावून अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 44 बालकांपैकी 43 बालकांची नोंद पीएम केअर पोर्टलवर करण्यात आली आहे. तसेच 44 बालकांपैकी 39 बालकांचे अनाथ प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयास सादर केले असून 17 बालकांचे प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून 5 बालकांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. कोवीड काळात अनाथ झालेल्या 44 बालकांपैकी 19 कुटुंबांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.अनाथ झालेल्या बालकांचे मालमत्तेवरील कायदेशीर हक्क अबाधित राहावे,यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 43 बालके उपस्थित असून 18 बालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेशीर मदत देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी गायकवाड यांनी दिली.
कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणात अडथळे येऊ नये, यासाठी महानगरपालिकांनीही मदत करावी. तसेच कोवीडमुळे पती गमावलेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ देण्यात यावे. तसेच कौशल्य विकास विभागाकडून त्यांना रोजगारासाठी ट्रेनिंगमध्ये समावेश करावा. कोरोनामुळे अनाथ झालेल्या व रस्त्यावरील बालकांना रेशन कार्ड, आधारकार्ड व इतर प्रमाणपत्र, दाखले देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत जेणे करुन त्यांना पुढील कालावधीमध्ये कोणताही त्रास होणार नाही, असे निर्देश ठोंबरे यांनी यावेळी दिले.
कोवीडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या स्माईल फाऊंडेशनच्या डॉ. उमा आहुजा यांना सत्कार करण्यात आला. तसेच विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या वन स्टेप सेंटरच्या कविता थोरात यांचा यावेळी ठोंबरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.