अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब
नवी मुंबई-: दरवर्षी प्रमाणे नवी मुंबई महपालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील अनधिकृत शाळांची जाहीर करण्यात येत असते. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याला दाखल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र यंदा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडत आला तरी देखील या शाळांची यादीअजून जाहीर केली नसल्याने या शाळांत आपल्या पाल्यांचा प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची फसगत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई शहरात शासनाची कोणतीही मान्यता न घेता व कागद पत्रांची पूर्तता न करता काही शाळा सुरू आहेत. अशा शाळांना नवी मुंबई महानगर पालिकेमार्फत अनधिकृत शाळा म्हणून दरवर्षी घोषीत करण्यात येते व अशा शाळांत प्रवेश घेऊ नये असे आवाहन देखील मनपातर्फे करण्यात येते. २०१९ ला नवी मुंबईत १४ तर २०२० व २०२१ ला १० अनधिकृत शाळा मनपातर्फे शाळांच्या नावांसकट यादी महापालिकेने प्रसिद्ध केली होती.आणि मागील वर्षी मार्च महिन्यात ही यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र यंदा एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवड्याला सुरूवात होईल तरी देखील या शाळांची यादी अजून जाहिर केली नाही. मुळात अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया ही डिसेंबरपासून किंवा जानेवारी व फेब्रुवारीपासून सुरू होते. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊन झालेले असतात. अनधिकृत असूनही हे संस्थाचालक जाहिरात बाजी करून दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावाखाली मुलांच्या पाल्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करतात. मुलांच्या शिक्षणाप्रति अनेक पालक पैशाची जमवाजमव करून शाळेच्या फी भरत असतात.आधीच प्रवेश घेतलेल्या पालकांना या शाळेच्या अनधिकृततेबाबत काहीही माहीत नसते. घराच्या जवळ शाळा असल्याने अनेक जणांचा कल या शाळांकडे वाढतो. या सर्व बाबींची कल्पना असतानाही नवी मुंबई महापालिकेने यंदा या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात उशिर होत असल्याने मोठ्या प्रमाणात पालकांची फसगत होत असते. मागील वर्षीच्या दहा शाळांपैकी दोन शाळा ह्या तुर्भे स्टोर परिसरात असुन त्यातील एका शाळेवर दोन महिन्यापूर्वी मनपाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र याशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण कुठे घ्यावे असा पेच येथील पालकांना पडला होता. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांची यादी तात्काळ जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई महापालिका विविध योजना व स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च करून मोठं मोठे होर्डिंग लावून जनजगृती करते. तर मग या अनधिकृत शाळांची यादी नवीमुंबईतील मुख्य चौक अथवा त्या त्या शाळांच्या बाहेर फलक लावून करू शकत नाही का? तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याआधी पालिकेने डिसेंबर किंवा जानेवारीपासून हे फलक लावले तर पालक वेळीच सावध होउ शकतात. - मंगल घरत, भाजप महिला मोर्चा सरचिटणीस
महापालिकेने ज्या पोट तिडकिने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्याच पोटतिडकीने जर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करुन त्याची व्यापक प्रमाणात जनजागृती केली तर हजारो विद्यार्थ्यांची फसगत थांबवता येऊ शकते. - विकास सोरटे, समन्वयक, नवी मुंबई पालक कृती समिती.
नवी मुंबई शहरातील अनधिकृत शाळांची सविस्तर माहिती घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांत अशा अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येईल. - जयदीप पवार, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका.