'जागर २०२२' चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

       नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त 'जागर २०२२' उपक्रमांतर्गत मान्यवर वक्त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत आठवी ते बारावीच्या गटात सहभागी 317 विद्यार्थ्यांमधून जुईनगर येथील रितेश महेंद्र गुप्ता या विद्यार्थी चित्रकाराने तसेच खुल्या गटात सहभागी 34  चित्रकारांमधून सानपाडा येथील कुणाल इतवेकर या चित्रकाराने प्रथम क्रमांक पटकाविला. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते विजेत्या चित्रकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

  या चित्रकला स्पर्धेकरिता आठवी ते बारावीच्या गटासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग, बाबासाहेब आणि पुस्तक हे तीन विषय देण्यात आले होते. यामध्ये विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५१ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या कल्पनेतील बाबासाहेबांच्या विचारांना तसेच प्रतिमांना चित्ररूपात रेखाटले. यामध्ये रितेश गुप्ता (जुईनगर), श्रेया वायंगणकर (कोपरखैरणे), प्रथमेश रिचवाड (रबाळे) हे अनुक्रमे ३ क्रमांकाचे तसेच तनेश सूळ (घणसोली), सानिका दुदुस्कर ( नेरुळ), खुशबू यादव ( रबाळे ) हे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले.

  खुल्या गटासाठी देण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, बाबासाहेब आणि पुस्तक तसेच बाबासाहेब - ज्ञान हीच शक्ती या तीन विषयांवर 37 चित्रकारांनी आपल्या मनातील संकल्पना चितारल्या. त्यामध्ये कुणाल इतवेकर( सानपाडा), आकाश पोतदार( नेरूळ), साहील पाटील( ऐरोली) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच नरेश लोहार (बेलापूर) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.


          दोन्ही गटांतील पहिल्या 3 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, 7500/- व 5 हजार रक्कमेची तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना 2 हजार रक्कमेची पारितोषिके वितरित करण्यात आली.

स्पर्धा परीक्षक अरविंद कांबळे, किर्तीराज राबणे, अमोल सत्रे यांचा तसेच स्पर्धा संयोजक अमोल खरात यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

 स्पर्धेमधील विजेत्या तसेच निवडक चित्रांचे प्रदर्शन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पहिल्या मजल्यावरील पोडीयम गार्डन पॅसेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन संपन्न झाले. पालकमंत्री महोदयांनी चित्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणाऱ्या या नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले तसेच ठाणे लोकसभा सदस्य खासदार  राजन विचारे यांच्यासह चित्रांचे अवलोकन करून पसंतीची दाद दिली. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी स्मारकाला भेट देणार्‍या हजारो नागरिकांनी चित्रप्रदर्शनाला भेट देत चित्रकारांच्या कलेची प्रशंसा केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खेळाच्या मैदानात उभारले अनधिकृत राम जानकी मंदीर, नागरिकांमध्ये नाराजी