घणसोली येथे शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
ऐरोली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून अंगणवाड्या व बालवाड्या बंद आहेत.त्यामुळे लाखो बालकांना शाळा पूर्व तयारीच्या कृतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळापूर्व तयारी व्हावी.त्याआधारे दाखल बालकांचे पहिलीच्या वर्गात सहज संक्रमण घडून यावे. म्हणून पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा पूर्व तयारी म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालकांच्या आदेशाने घणसोली येथील मनपाच्या जनजागृती मेळाव्याला विद्यार्थ्यां बरोबरच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
घणसोली गावातील मनपाच्या ४२ क्रमांक शाळेत मुख्याध्यापक खुशाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बालवाडीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात पहिल्यांदा पहिलीच्या वर्गात प्रदार्पण करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्याची लेझीम पथकांच्या साहाय्याने प्रभात फेरी पर जनजागृती फेरी घणसोली मुख्य रस्ता, डी मार्ट त्यानंतर सेक्टर सात दरम्यान काढली. त्यानंतर सेक्टर सात मधील मनपाच्या बालवाडी मध्ये शिक्षण घेणारे विध्यार्थी व शिक्षकांना प्रभात फेरीत सामावून घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक घनश्याम मढवी व शालेय समितीच्या अध्यक्षा रेखा कांबळे, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर शाळा क्रमांक ४२ मध्ये आल्यानंतर स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉल वर दोन ते तीन शिक्षक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचपणी करण्यासाठी बसले होते. चाचपणीमध्ये विध्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनात्मक, भाषा विकास व गणनपूर्व तयारी यावर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या मध्ये विध्यार्थी अयशस्वी झाल्यास स्वतः पालिकेचे शिक्षक अयशस्वी विध्यार्थ्यांच्या घरी जाऊन विध्यार्थ्यांना व पालकांना सहकार्य करणार आहेत. त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून विध्यार्थ्यांची चाचणी घेऊन स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
यावेळी मुख्याध्यापक खुशाल चौधरी, ज्येष्ठ शिक्षक संजय मोरे, प्रकाश मढवी, मधुरा शेडगे, समीक्षा लोट, आत्माराम अगरे, बबन दरेकर, किशोर कानडे व इतर उर्वरित शिक्षकांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच अगदी हसतखेळत नियोजनबद्ध मेळावा पार पडला. तसेच पालकांनीही मेळाव्याचे कौतुक केले.