नवी मुंबईत भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते बुद्धविहाराचे उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना
नवी मुंबई : बोधीसत्व प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून बाबासाहेबांचे नातू तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते 131 व्या 'भीम जयंती'चे औचित्य साधून तुर्भे स्टोर येथील पंचशील बुद्ध विहार शाखेचा नूतनीकरण उद्घाटन व बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्याचा सोहळा 15 एप्रिल रोजी सायं. 8 वा. मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याच्या वेळी आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन करताना समाजाला प्रतिगामी शक्तींपासून कसे सजग राहिले पाहिजे त्यासाठी पुरोगामी विचारांचा रथ कसा पुढे न्यावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. ज्याप्रमाणे बुद्धगया येथील विहारावर प्रतिगामी शक्तींनी आपला जम बसवला आहे त्याच प्रमाणे मध्यप्रदेश, महू येथील बाबासाहेबांच्या जन्मभूमी वर देखील ते काबीज करू पहात आहेत तो कट हाणून पाडण्यासाठी मी स्वतः तेथे जाऊन तेथील कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन ठीक ठिकाणी रॅली काढून कार्यक्रमांचे आयोजन केले. यासह तेथील आंबेडकरी अनुयायांना स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले.
सनातनी संस्कृती पुनश्च पुरोगाम्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली विविध राजकीय संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे व सत्ता हस्तगत केली पाहिजे असे आवाहन . भिमराव आंबेडकर यांनी जनतेला केले. आपली सांस्कृतिक आयडेंटिटी जपण्यासाठी आपण "जय भीम नमोबुद्धाय" म्हणावे असा मार्मिक संदेशही त्यांनी आपल्या भाषणात दिला.
यावेळी भीमराव आंबेडकर यांच्या स्वागत समयी आकर्षक लेझीम पथकाने सुंदर कला प्रदर्शन केले याशिवाय उपस्थित मान्यवरांकडून दानदात्यांचा व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा, पंचशील बुद्ध विहार शाखा, तुर्भे स्टोअर च्या वतीने अध्यक्ष सतीश खंडाळे, उपाध्यक्ष नितीन बनसोडे, कोषाध्यक्ष प्रवीण खंडाळे, जयंती कमिटी सरचिटणीस रामदास शिनगारे, सरचिटणीस भा. बौ. म. तुर्भे शाखा उमेश शिरसाट, कार्यालयीन सचिव सुधीर ढवळे, संघटक जगदीश बनसोडे संतोष येटाळे,अजय गायकवाड आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी समता सैनिक दलाच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने समता सैनिक दलाचे कमांडर इं चीफ आद. भीमराव आंबेडकर यांना सलामी देण्यात आली.