'पुस्तक वाचनाने आम्ही वाचलो - तुम्हीही वाचा' युवा व्याख्यात्यांचे आवाहन
नवी मुंबई : वाचनामुळेच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे वाचत राहिले पाहिजे असे आवाहन करीत विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवित असलेल्या युवा पिढीच्या प्रतिनिधींनी स्वानुभव कथन करीत वाचनामुळे आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न बाबासाहेव आंबेडकर जयंती उत्सवाचे औचित्य साधून ३० मार्चपासून ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 'जागर २०२२' हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सातवे व्याख्यानपुष्प गुंफताना आयआरएस अधिकारी क्रांती खोब्रागडे, उद्योजक गौरव सोमवंशी, कोरा ऑनलाईन प्रश्नमंच प्रमुख प्रशांत ननावरे, सॉफ्टवेअर इंजिनिअर गुणवंत सरपाते, दंत चिकीत्सक डॉ. निशीगंधा दिवेकर या तरुणाईच्या प्रतिनिधींनी 'युवकांच्या नजरेतून' या कार्यक्रमांतर्गत 'आम्ही वाचलो : तुम्हीही वाचा' म्हणत वाचनसंस्कृतीचे स्वविकासातील महत्व विषद करीत श्रोत्यांशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाबासाहेबांची जयंती आगळ्यावेगळ्या पध्दतीने वैचारिक जागर करीत साजरी व्हावी या महानगरपालिकेच्या उद्देशाला सर्व व्याख्यान कार्यक्रमांना अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन श्रोत्यांनी सहयोग दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावर्षी 2022 मध्ये सुरु झालेली ही परंपरा यापुढील काळातही अधिक उत्साहाने सुरु राहील असा विश्वास त्यांनी यावेळी अभिव्यक्त केला.
आयआरएस अधिकारी क्रांती खोब्रागडे यांनी लहानपणापासूनच वाचनाची आवड होती असे सांगत बाबासाहेब प्रवासातही पुस्तक सोबत घेऊन जायचे आणि सतत वाचत असायचे, हा आदर्श नजरेसमोरून ठेवूनच नियमित वाचत राहिले पाहिजे हे मनाशी पक्के केले असे सांगितले. एखाद्या विषयावर ठामपणे बोलण्यासाठी आपला त्या विषयाचा दांडगा अभ्यास असला पाहिजे व तो वाचनातूनच येतो, त्यामुळे आपल्याला रस आहे अशा विषयावर विपुल पुस्तके वाचा असा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.
उद्योजक गौरव सोमवंशी यांनी वाचनाची जपलेली आवड आणि त्यातून विस्तारत गेलेले विविध विषयांवरील वाचन व त्यामधून उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या संधी याविषयी विविध अनुभव कथन केले. वाचनामुळे एक वेगळी दृष्टी मिळाल्याचे सांगत मनात येणाऱ्या विचारांना ब्लॉगच्या माध्यमातून मुक्त अवकाश खुले करून दिले असे ते म्हणाले.
दंत चिकित्सक डॉ. निशीगंधा दिवेकर यांनी शिक्षकआईवडिलांकडून घरातूनच मिळलेल्या वाचनाच्या वारशाबद्दल भरभरून बोलत समृध्द मराठी साहित्यपरंपरेचे विविध उदाहरणे देत, कविता - शायरी पेश करीत दाखले दिले. पुस्तके लढण्याची प्रेरणा देतात, एकाकीपणात साथ देतात, पुस्तकांमुळे संदर्भ पडताळण्याची सवय लागते, वाचनाची बैठक तयार होते, जिचा उपयोग्य उच्च शिक्षणासाठी तासनतास कराव्या लागणाऱ्या अभ्यासासाठी होतो असे वाचनाचे अनेक फायदे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोषणांपेक्षा वाचनामुळे खरे कळतील असे मत मांडले.
सॉफ्टवेअर इंजिनिअर गुणवंत सरपाते यांनी वाचनाची आवड कशी लागली याबद्दलचे अनुभव सांगत वाचनामुळे आयुष्य कसे बदलून गेले व व्यक्तिमत्वाचा कसा विकास झाला याविषयी भाष्य केले. पुस्तकांचा आयुष्याच्या जडणघडणीतील मोलाचा वाटा सांगत त्यांनी त्यामधूनच मनात साचलेला गुंता लेखनातून सोडविण्याची प्रेरणा मिळाली असे मत व्यक्त केले.
कोरा ऑनलाईन प्रश्नमंच प्रमुख प्रशांत ननावरे यांनी पुस्तकांमुळे समृध्द झालोच शिवाय पुस्तक वेडामुळे अनेक क्षेत्रातील मंडळींना भेटता आले असे सांगत वाचन हे केवळ पुस्तकांचेच नव्हे तर ज्या मंचावरून माहिती, ज्ञान उपलब्ध होईल अशा सर्व नव्या डिजीटल माध्यमांचाही प्रभावीपणे उपयोग करून घ्यायला हवा असे वेगळे विचार मांडले.
पाचही वक्त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने भव्यतम स्वरूपात उभारलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रशंसा करताना भारावून गेलो असे सांगत त्यामधील समृध्द ग्रंथालयाचे विशेष कौतुक केले. राष्ट्रपुरुषांना वंदन करण्याची ही सर्वोत्तम व इतरांनी अनुकरण करावे अशी संकल्पना असल्याचे अभिप्राय व्यक्त करण्यात आले.
'जागर 2022' अंतर्गत आयोजित वैचारिक उपक्रमांमध्ये मराठी चित्रपट सृष्टी प्रमाणेच बॉलिवूडला गवसणी घालणारे व सामाजिक जाणीवा जपत त्या तीव्रतेने अविष्कृत करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करणार आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात शुकवार दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वा. संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी श्रोत्यांनी वैचारिक जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.