यंदा हापूसची मागणी वाढली,आवक मात्र कमीच दर चढेच

नवी मुंबई-: फळांचा राजा म्हणून हापुस आंब्याची चव सर्वानाच हवी हविशी वाटते. त्यामुळे हापुसचा हंगाम सुरू होताच ग्राहकांची पाऊले आंबा खरेदीसाठी बाजार पेठेकडे वळतात. एप्रिलमध्ये हापुसचा खरा हंगाम सुरू होतो. मात्र यावेळी अवकाळी पावसाने सुरुवातीचे उत्पादन घटले आहे तसेच कोरोना कालावधीत मागील दोन वर्ष हापूसला बाजारातून कमी मागणी होती ते आता यावर्षी सर्व सुरळीत झाल्याने मागणी वाढली आहे. परंतू एप्रिल महिना अर्धा उलटला तरी  हापूसची आवक खूपच कमी असल्याने हापुसचे दर जैसे थे वैसेंच  आहेत. 

  एप्रिल- मे महिन्यात हापूसच्या खऱ्या हंगामाला सुरुवात होत असते, जास्तीत जास्त आंबाप्रेमींचे हापुस खरेदीकडे विशेष लक्ष असते. मात्र एपीएमसी बाजारात हापूसची आवक अद्याप वाढली नाही. १५ एप्रिलनंतर आवक वाढेल असे मत व्यक्त करण्यात येत होते.  एपीएमसी बाजारात देवगड हापूसच्या २६ हजार पेट्या तर  कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील २० हजार क्रेट हापूसची आवक होत आहे. २५ एप्रिल ते  १० मे दरम्यान हापूसची आवक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी या महिन्यात हापुसच्या ८०-९० हजार पेट्या तर कर्नाटकही आवक वाढते, मात्र यंदा सुरुवातीला मोहोर फुटण्याची वेळ आणि त्यादरम्यान अवकाळी पावसाने उत्पादनावर पाणी फेरले आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी होत आहे. मागील दोन वर्षात करोना कालावधीत एपीएमसी बाजारात हापूसला मागणी कमी झाली होती. या काळामध्ये हापूसची गृह संकुलामध्ये थेट विक्री करण्यात येत होती. तसेच या दरम्यानच्या कालावधीत बरीच  किरकोळ विक्री ही कमी झाली होती, मात्र आता करोना पूर्णपणे आटोक्यात असून सर्व व्यवस्था सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नेहमीचे किरकोळ विक्रेतेही वाढले आहेत. त्यामुळे बाजारात हापूसला मागणी वाढली आहे. परंतु यावर्षी आवक कमी होत आहे. परिणामी हापूसचे दर स्थिर आहेत. एपीएमसी घाऊक बाजारात ४ ते ६ डझन पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विक्री होत आहे. डागाळलेली हापूस पेटी दीड ते दोन हजाराने विक्री होत आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१७ एप्रिल ठाण्यात १० वी, ११ वी १२ वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी मार्गदर्शन शिबीर