नवी मुंबई शहरात हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावात साजरी

नवी मुंबई-:जय हनुमान ज्ञान गुन सागर ,जय कपीस तिहुं लोक उजागर अशा जयघोषात नवी मुंबई शहरात शनिवारी हनुमान जयंती मोठ्या भक्तीभावात साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षापासून कोविड मुळे हनुमान जयंती साजरी करता न आल्याने यंदा कोविड निर्बंध हटल्याने भक्तमंडळीत कमालीचा उत्साह दिसून आला.

संकटमोचन, बलोपासनेसह बुद्धीची देवता म्हणूनही ज्याकडे पाहिले जाते अशा महाबली हनुमानाची जयंती नवी मुंबई शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवनपुत्र हनुमान की जय, संकटमोचन हनुमान की जय, अशा घोषणांनी शहर व परिसर दुमदुमून गेला होता. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शहरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण, स्तोत्र पठण, महाआरती, महारुद्र अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे गावातील हनुमान मंदिराच्या वतीने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेली पालखी, जन्मकाळ सोहळा, सुंठवडा वाटप आणि हनुमान स्तोत्र अशा भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. भाविकांनी श्री हनुमंताला रुईचा हार, पंचामृत आणि तेल वाहिले. बेलापूर गाव,सीवूड्स, नेरुळ, सानपाडा, वाशी,जुहू, कोपरी गाव, महापे गाव, तुर्भे गाव, ऐरोली या परिसरांमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. घणसोली गावात हनुमान जयंती उत्सव घणसोली देवस्थान संस्थेच्या वतीने हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यंदा कोविड निर्बध हटल्याने हनुमान जयंतीला भक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. मात्र सध्या राज्यात हनुमान चालीसा आणि  भोंगे यावरून तापलेले वातावरण पाहता  कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून हनुमान जयंतीच्या उत्सवावर पोलीस देखिल नजर ठेवून होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यंदा हापूसची मागणी वाढली,आवक मात्र कमीच दर चढेच