महापे एमआयडीसीतील रस्त्यावरील खड्यांचे शुक्लकाष्ठ संपणार ?
नवी मुंबई-: मागील चार पाच वर्षापासून महापे एमआयडीसीमधील रस्त्यांची चाळण होऊन रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले होते.त्यामुळे येथील व्यवसायिक व वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत होता. मात्र एमआयडीसी महामंडळाच्या वतीने येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून लवकरच त्याची सुरूवात होणार आहे. त्यामुळे महापे एमआयडीसीतील रस्त्यावरील खड्यांचे शुक्लकाष्ठ संपणार आहे.
नवी मुंबई शहर वसण्याआधी या शहरात एमआयडीच्या वतीने औद्योगिक वसाहत वसवली आहे. त्यामुळे या शहराला औद्योगिक नगरी देखील संबोधले जाते. आणि या वसाहतीत दळण वळण करण्यासाठी आधी डांबरी रस्ते होते. मात्र कालांतराने या रस्त्यांची दुरवस्था होत राहिली. त्यामुळे या भागातील दळण वळण वेगाने व्हावे म्हणून नवी मुंबई महानगर पालिका व एमआयडीसी मार्फत या ठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्यावर काँक्रीट रस्त्याचे जाळे उभारण्याचे काम केले आहे. एमआयडीसीतील रबाले, दिघा, खैरणे, तुर्भे, शिरवणे आदी ठिकाणी रस्ते तयार झाले असताना महापे ए ब्लॉक मधील रस्ता लालफितीत अडकला होता.
महापे एमआयडीसीतील 'ए ब्लॉक' मध्ये संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की या खड्डयांतून वाहन चालकांना आपली वाहने काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. एमआयडीसी भागात छोटे मोठे कारखाने आहेत. या कारखान्यातील तयार माल आणि कच्चा माल ने-आण करण्यासाठी व्यवसायीक ट्रान्सपोर्ट वाहने मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र या खड्डयांमुळे या वाहन चालकांना प्रचंड त्रास होत असे. शिवाय खड्ड्यात वाहने आदळत असल्याने वाहनांचे, सामानाचे नुकसान होत असे. तसेच या खड्डयांमुळे वाहन चालकांना पाठ दुःखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असे. त्यामळे वाहन चालकही नोकऱ्या सोडून जात असल्याने महापे परिसरातील ट्रान्सपोर्ट मालक भल्या मोठ्या संकटात अडकले होते. मात्र या भागातील खड्यांचे शुक्लकाष्ठ आता लवकरच संपणार असून एमआयडीसी मार्फत या भागात १५ किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यासाठी १३८ कोटी खर्च होणार आहे.