नेरुळ मधील रॉक गार्डनचा संपूर्ण विकास करण्याची मागणी
नवी मुंबई -: नेरुळ मधील रॉक गार्डन या उद्यानाचा मागील बऱ्याच वर्षांपासून अर्धवट राहीलेला अविकसित भाग कधी विकसित करणार ? असा सवाल करत नवी मुंबई महापालिकेचे रॉक गार्डनचा संपूर्ण विकास करावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. उद्यानाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख असून शहरातील उद्यान अधिकाधिक विकसित करण्यावर मनपाने नेहमीच भर दिला आहे. मात्र नेरुळ मधील रॉक गार्डनचा अजून १०० % विकास करण्यात आला नाही. त्यामुळे या उद्यानाचा अर्धवट राहिलेला विकास करावा म्हणून येथील सिद्धिविनायक, सोसायटी सेक्टर २१, मधील रहिवाशांनी या समस्येबाबत पुढाकार घेऊन महापालिकेचे आयुक्त आणि उद्यान विभाग यांना वारंवार निवेदन दिले आहेत. रॉक गार्डन एकूण ४० हजार स्क्वेअर मीटरवर विकसित करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र अवघ्या २८ हजार स्क्वेअर मीटरच उद्यानाचा विकास करण्यात आलेला आहे. उर्वरित १२ हजार स्क्वेअर मीटर हा विभाग विकसित न केल्याने त्या ठिकाणी जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याठिकाणी विषारी सापांचा वावर आहे. त्यामुळे या राहिलेल्या उद्यानाचा विकास करावा अशी मागणी होत आहे. या जागेत मियावाकी पद्धतीने वृक्षरोपण करण्याचे नियोजन होते. मात्र उद्यानाची उर्वरित जागा ही खडकाळ असल्याने त्याठिकाणी मियावाकी वृक्षारोपण शक्य नाही अशी माहिती मनपा उद्यान विभागामार्फत देण्यात आली आहे.