कचरामुक्त एपीएमसीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ?
नवी मुंबई -: नवी मुंबई शहर संपूर्ण कचरा मुक्त होण्यासाठी महापालिकेकडुन आता गावठाण झोपडपट्टी भागात ही झीरो वेस्ट मॉडेल म्हणजेच कचरा मुक्ती शहर राबविण्यात येत आहे. एकीकडे महापालिका शहरातील सोसायट्यांना तसेच घरगुती खत निर्मिती प्रक्रियावर भर देत आहे, असे असताना मात्र दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एपीएमसी मधील कचऱ्याची विल्हेवाट तसेच कचरा मुक्त एपीएमसीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचबरोबर गेले कित्येक वर्षांपासून एपीएमसी बाजार समितीचा चर्चेत असलेला कचरा विल्हेवाट आणि खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्प ही रेंगाळलेलाच आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २०११ मध्ये अजित पवार यांच्या हस्ते या खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी एपीएमसीला सिडकोकडून जागा देण्यात आली होती. त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र अद्याप त्या प्रकल्पाबाबत काहीच तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका स्वच्छता सर्वेक्षणात सर्व शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी धडपड करत आहे. मागील स्वच्छता सर्वेक्षण झोपडपट्टी आणि गावठाण विभागात शून्य कचरा निर्मिती ही संकल्पना साध्य झाली नव्हती ती साध्य करण्यासाठी आता गावठाण आणि झोपडपट्टी विभागात ही झीरो वेस्ट मॉडेल राबविण्यात येत आहे . नवी मुंबई महापालिका शहरातील सर्व गृह संकुलांना कचरा निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट लावून खत निर्मिती प्रक्रिया यावर भर देण्यात येत आहे. असे असताना महापालिका बाजार समितीच्या कचऱ्याकडे कसे दुर्लक्ष करत आहे ? सा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे . एपीएमसी बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या पाच हीबाजारातून दररोज दिवसाला ६० टन कचरा निर्माण होत असतो . विशेषता भाजीपाला आणि फळे बाजारात नाशवंत वस्तू जास्त असल्याने या ठिकाणी अधिक ककचरा निर्माण होतो. एपीएमसी बाजार समितीकडे स्वतःची अशी स्वतंत्र कचरा विल्हेवाट आणि खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्प अजून अस्तित्वात आलेला नाही . नवी मुंबई महापालिके कडून देखील एपीएमसी बाजार समितीला कचरामुक्त बाबत कोणत्याही सूचना देताना निदर्शनास येत नाही . बाजार समितीचा कचरा विल्हेवाट आणि वाहतूक करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला स्वतःच्या तिजोरीतून खर्च करावा लागत आहे . एकीकडे कचरा मुक्त शहर याकडे सातत्याने लक्ष केंद्रित केले जात आहे, पण एपीएमसी बाजार समिती दुर्लक्षित का होता आहे ? अशी चर्चा शहरात सुरू आहे. एपीएमसी बाजार समितीची ही स्वतंत्र कचरा क्षेपणभूमी असावी असे मत बाजारातील घटकांमधून व्यक्त होत आहे.