नवी मुंबई शहरात अवैध नाईट लाईफचे पेव

नवी मुंबई-: नवी मुंबई शहराला आधीच फेरीवाल्यांचा विळखा बसला असताना शहरात आता रात्रीच्या वेळी देखील अनधिकृत फेरिवाले चौका चौकात व्यवसाय करू लागले असल्याने शहराला अवैध नाईट लाईफचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे मनपा व पोलीस अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने नवी मुंबई शहरात अवैध नाईट लाईफ सूर झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.त्यामुळे अशा व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

निश्चय केला नंबर पहिला असा डंका पिटवत नवी मुंबई शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे पारितोषीक मिळवण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून वारेमाप खर्च केला जात आहे. फुटपाथ सजवणे भिंती रंगवणे चौकाचौकात विविध कलाकृतीचे वास्तु उभारणे तसेच रोषणाई करून नवी मुंबईला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न नवी मुंबई महानगरपालिकेकडून होत आहे आणि याला भरमसाठ पाठिंबा नवी मुंबईचे नागरिक देत आहेत. जेणेकरून आपले नवी मुंबई शहर स्वच्छ आणि सुरक्षित राहावे यासाठी सर्वजण झटत आहेत. मात्र या मेहनतीवर काही राजकीय पदाधिकारी, मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पाणी फेरले जात आहे. कारण नवी मुंबईच्या चौका चौकात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडलेले असते. हे कमी होते म्हणून आता रात्रीच्या वेळी देखील शहरात अनधिकृत फेरीवाले वाढू लागले आहेत. यात सर्वाधिक खाद्य पदार्थ विकले जाणारे फेरीवाले असून चार चाकी वाहनातून व्यवसाय केला जात आहे. ही सर्व अनधिकृत चार चाकी वाहने मुख्य रस्त्यावरील आणि चौका चौकात रात्री उशिरा तसेच पहाटेपर्यंत चालू असतात. नवी मुंबईतील दिघा पासून बेलापूर पर्यत अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत असतात. त्यात ठाणे बेलापूर रस्ता, वाशी कोपर खैरणे रस्ता, सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्थानके अशी प्रमुख ठिकाणे आहेत. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर मनपा महापालिका अधिनियमाद्वारे जरी कारवाई  करीत असली तरी रात्रीच्या वेळी अवैध व्यवसायिकांवर मुंबई पोलीस कायदा प्रमाणे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र अशा अवैध व्यसायिकांकडून मनपा आणि पोलीस प्रशासनाचे हात ओले केले जात असल्याने अशा व्यवसायिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात आता अवैध नाईट लाईफ सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे अशा व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचरामुक्त एपीएमसीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ?