डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके क्रांतीची हत्यारे आहेत-उत्तम कांबळे

नवी मुंबई : माणसांच्या जगण्याच्या जीवनावश्यक गरजा दुर्लक्षित करीत मध्यमवर्गीयांच्या जगण्याला माणसापासून दूर करण्याची बाब भांडवलदारांकडून जागतिकीकरणात झाली असून ही आमच्या दृष्टीने किती घातक आहे हे सामान्य मध्यमवर्गीयांच्या लक्षातच आले नाही, आम्हाला चैनीच्या वस्तूंची गरज नसताना त्या वस्तू लादत वेळ प्रसंगी आमिषे दाखवत, कर्ज मंजूर करून देत आम्हाला फसविण्याचा डाव जागतिकीकरणाच्या धोरणात यशस्वी झाल्याचे मत ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सानपाडा येथे व्यक्त केले.

सानपाडा पाम बीच या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने जागतिकीकरण आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा या विषयावर मनोगत व्यक्त करताना उत्तम कांबळे यांनी आपले विचार मांडले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले या विरुद्ध आपण जागृत होण्याची गरज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके क्रांतीची हत्यार म्हणून वापर करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच फुले-शाहू-आंबेडकरांच्या देशांमध्ये शोषणाची परंपरा आजही कायम असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले.

भारतीय समाज व्यवस्थेतील प्रत्येक भारतीयांचा विचार करीत डॉ. बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केली, देश एकसंघ रहावा जगाच्या दृष्टीने भारताची आणि भारतीयांची महत्त्वपूर्ण ओळख निर्माण व्हावी हा विचार समोर ठेवत जो प्रयत्न केला त्यामुळेच भारताची लोकशाही 75 वर्षे टिकून आहे हे विसरता येणार नाही. असे विचार साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनी याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार आणि सामाजिक वाटचाल या विषयावर बोलताना मांडले. यावेळी पुढे ते म्हणाले, सामाजिक वाटचाल ही जात चौकटीत अडकवत, कुटुंबपुरता सीमित राहणारा माणूस अधोगतीकडे नेताना दिसतोय,  धर्म-जात यांना भाकरी पेक्षा अधिक महत्त्व देत राज्यकर्ते सामान्य माणसाला वेठीस धरत असून हा लोकशाहीला सर्वांत मोठा धोका असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कदम होते विचार मंचावर धनश्री घाडगे, स्नेहल गमरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्षा भारती सुनील बैसाणे, सचिव कविता विलास जमदाडे, खजिनदार अनिता सोनवणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन अरुण अहिरे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उष्म्या वाढल्याने  एपीएमसीत भाज्यांची दरवाढ