डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कला केंद्र टाकणार कात
नवी मुंबई-: वाशी सेक्टर 10 येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कलाकेंद्राची देखील दुरावस्था झाली असून त्याची डागडुजी करून सुधारणा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी केली होती. आणि या मागणीची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदर वास्तूच्या डागडुजी आणि रंगकाम करण्याची निविदा काढली असल्याने लवकरच या वास्तूला नवी झळाळी मिळणार आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात रंगरंगोटीच्या कामावर करोडो रुपयांची दौलत जादा केली जात आहे. मात्र दुसरीकडे मनपाने तयार केलेल्या वास्तूंची योग्य देखभाल न केल्याने या वास्तूंची पुरती दुरावस्था झाली आहे. वाशी सेक्टर 10 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कलाकेंद्राची देखील दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ज्यांनी देशासाठी व माणुसकीसाठी आपलं आयुष्य वेचल व देशाला सार्वभौमत्वाच्या चौकटीत ज्यांनी बांधून ठेवले अशा महमानवाच्या नावाने असलेल्या वास्तूची देखभाल दुरुस्तीकडे मनपा लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे सदर वास्तूची तात्काळ देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी समाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांजकडे केली होती. आणि या मागणीची दखल घेत मनपाने सदर वास्तूच्या डागडुजी आणि रंग काम करण्याची निविदा काढली आहे. त्यामुळे विकास सोरटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.