मनपा आयुक्तांचा लिंगायत समाजाकडून सत्कार
नवी मुंबई:- नवी मुंबई शहरात कोरोना संक्रमण परमोच्च शिखरावर असताना मनपा आयुक्तांची धुरा सांभाळून योग्य नियोजनाद्वारे व प्रत्यक्ष लक्ष घालून शहरातील कोरोना संक्रमण कमी करण्यात मोलाचा वाटा आयुक्त अभिजित बांगर यांनी उचलला आहे.तसेच आपल्या सणवैशिष्ट्यपूर्ण आणि शिस्तबध्द कार्यपद्धतीने जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मनपा आयुक्तांनी केलेल्या या कामगीरी बद्दल नवी मुंबईतील लिंगायत समाजाच्यावतीने मनपा आयुक्त बांगर यांचा सत्कार करण्यात आला. लिंगायत समाजासाठी कार्य करणारी संस्था 'शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी'ने समस्त लिंगायत समाजाच्या वतीने आयुक्त अभिजीत बांगर यांना 'आभार पत्र' प्रदान करत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. महात्मा बसवेश्वरांची सुबक मुर्ती देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शहरातील रूग्णालये आधुनिक वैद्यकिय उपकरणांनी अद्ययावत करत वैद्यकिय सुविधा शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी न.मुं.म.पा.ने आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आयुक्तांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. या अनुषंगाने आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व लिंगायत समाजाकडून त्यांचा सन्मान करण्याचे संस्थेने ठरविले असल्याचे यावेळी सह सचिव आनंद सोमेश्वर गवी यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जी. बी. रामलिंगय्या, सह खजिनदार सुनील पाटील, कार्यकारी मंडळाचे सदस्य वैजनाथ आग्रे, विजय तोगरे, सिध्दाराम शिलवंत, महेश कोटीवाले आणि आनंद गवी उपस्थित होते.