पारसिक हिल उतार कापल्याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश  

नवी मुंबई:- पारसिक हिल टेकडीवर शुशोभिकरणाच्या नावाखाली असलेल्या झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.अशी माहिती बी एन कुमार यांनी दिली आहे.

पारसिक हिल वर पूर्णपणे वाढ झालेले वृक्ष कापून आणि जाळून टाकण्यात आले आणि त्याठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली टेकडीच्या उतारावर फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. डोंगर पायथ्यापासून पायऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच टेकडीवर दोन मोठे फलक उभारण्यात आले आहेत आणि यासाठी खोदकाम करण्यात आले होते.त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडको भवन आणि कोंकण भवन समोरील टेकडीच्या पूर्वेकडील भागाचा सातत्याने ऱ्हास होत असून याबाबत पर्यावरण प्रेमी बी एन कुमार यांनी ठाणे जिल्हाधीकारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्या आहेत. त्यावर ठाकरे यांनी यापूर्वीच वन आणि नगर विकास विभागाच्या सचिवांना या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. वन सचिव पी. वेणुगोपाल रेड्डी यांनीही मुख्य वनसंरक्षकांना या संबंधात तपासणी करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या आहेत. त्यावर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने राबविलेल्या मोहिमेला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पारसिक हिल्स उतार कापणी प्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याविषयीचे निर्देश दिले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

"महाराष्ट्र श्री २०२२" राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत पुरुष गटात मुंबईच्या अक्षय मोगरकरने पटकाविला किताब