शाइनिंग एंजल्स असोसिएशन नवी मुंबई व दीपशिखा फौंडेशनचे शाळकरी मुलींसाठी मदतकार्य
नवी मुंबई ः शाइनिंग एंजल्स असोसिएशन नवी मुंबई व दीपशिखा फाऊंडेशन यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दुर्गम भागात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वणई-अमृतपाडा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभले शाळांमध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या मुलींसाठी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून संयुक्तपणे अभियान राबवले. यावेळी मासिक पाळी म्हणजे काय, त्या दरम्यान घेण्याची काळजी व वैयक्तिक आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी मार्गदर्शन करुन सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
वयात आल्यानंतर शरीरात होणारे वेगवेगळे बदल, मासिक पाळी म्हणजे काय यादरम्यान शरीरात कुठले बदल होतात या दरम्यान स्वच्छता कशी राखावी व आरोग्य स्वस्थ कसं ठेवावं याबद्दल मार्गदर्शन दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा चौधरी यांनी केले. त्याच बरोबर मासिक पाळी म्हणजे कुठलाही आजार नसून ते आपल्या साठी वरदान आहे आपण त्यामुळे कमजोर नाही तर सृष्टीचे निर्मात्या आहोत, नैसर्गिकरित्या जरी आपण शरीराने कमजोर असलो तरी आत्मविश्वासाने आणि बुद्धीच्या जोरावर आपण वाईट परिस्थितीला सक्षमपणे ताेंड देऊ शकतो असे सांगून सॅनिटरी पॅड्स वापरतांना कशाप्रकारे वापरावे जेणेकरून आरोग्याला व पर्यावरणालाही वाचवता येईल याबद्दल विस्तृत अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली. कार्यक्रमाच्या आयोजनात शायनिंग एंजल्स असोसिएशन, नवी मुंबईचे सचिव निशांत राठोड व महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य सदस्य आदर्श शिक्षक सिद्धेश्वर यादव यांनी परिश्रम घतले. लवकरच डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील एकूण २६ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.