कोव्हीड काळात केलेल्या समर्पित कामाबद्दल नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा "कोव्हीड योध्दा सन्मान"
नवी मुंबई : कोव्हीड विरोधात आपण लढाई लढलो त्यामुळे कोव्हीड योध्दा असे म्हटले जाते. या काळात प्रत्येक घटकाने अत्यंत जबाबदारीने व झोकून देऊन काम केले, त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोव्हीड योध्दा सन्मान करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या विशेष समारंभात महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी समुहांचा कोव्हीड प्रभावित काळात केलेल्या समर्पित कामाबद्दल कोव्हीड योध्दा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांप्रमाणेच या लढ्यात सेवाभावी वृत्तीने वेगवेगळ्या प्रकारचे मदतकार्य करणा-या सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे अशा विविध घटकांचे महत्वाचे योगदान असल्याचा उल्लेख करीत त्यांचेही कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, नमुंमपा कोव्हीड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गिरीश राजाध्यक्ष, नमुंमपा कोव्हीड पिडीयाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विजय येवले तसेच टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गजानन वेल्हाळ, डॉ. उदय जाधव, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. अक्षय छल्लानी, डॉ. अजय कुकरेजा, डॉ. जेस्सी एलिजाबेथ आणि पिडीयाट्रिक टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जितेंद्र गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कामाची दखल घेण्यासाठी आपण काम करीत नसलो तरी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली गेली पाहिजे. यामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोव्हीड काळात सर्वांनी सांघिक भावनेने काम केले त्यामुळे कोव्हीड योध्दा सन्मान करतानाही तो समुहांचा करण्यात येत असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. ट्रेसींग, टेस्टींग आणि ट्रिटमेंट या तिन्ही गोष्टींकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिल्याने व सर्वांशी विचारविनिमय करून त्यानुसार कार्यवाहीचे नियोजन केल्यामुळे नवी मुंबईतील कोव्हीड परिस्थिती कायम नियंत्रणात राहिली असे सांगत त्यांनी यामध्ये टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्वाचे ठरल्याचे मत व्यक्त केले.
कोव्हीड प्रसाराला जलद आळा घालण्यासाठी टेस्टींगवर विशेष भर देण्यात आला. त्यादृष्टीने स्वत:ची आरटी-पीसीआर लॅब सुरु करण्यात आली. लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळे पहिल्या डोसचे व दोन्ही डोसचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. सिडको कोव्हीड सेंटरप्रमाणेच इतर कोव्हीड सेंटरमधील सुविधांबद्दलही नागरिकांकडून तसेच शासन पातळीवरून प्रशंसा कऱण्यात आली. एखाद्या नागरिकाकडून कोणतीही सूचना आली तर त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यावर भर देण्यात आला. या प्रतिसाद कालावधीबद्दलही (Response Time) समाधान व्यक्त करण्यात आले असे आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले.
कोव्हीडच्या दुस-या लाटेत व्हेंटिलेटर्स उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा याबाबतची हतबलता अनुभवली. त्यामुळे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार तिस-या लाटेची पूर्वतयारी करताना महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षमीकरण करण्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले. कोव्हीड कालावधीत नाही हा शब्द नव्हता. त्यातही वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचा-यांनी ज्या समर्पित भावनेने काम केले त्याचा कृतज्ञतापूर्वक विशेष उल्लेख आयुक्तांनी केला.