गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण कार्यक्रम

पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०८ व ०९ एप्रिल रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविदयालयात 'गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
 
           गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला वर्ग याकडे दुर्लक्ष करतात.बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या 'हाय रिस्क' प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. 
 
         या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या लसीकरण डोस महाशिबिर पार पडले आणि त्यामध्ये ०१ हजार मुलींचे मोफत लसीकरण झाले होते, त्या पहिल्या डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त आहे, त्या अनुषंगाने दुसरा डोस देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी विनोद नाईक (७९७७७७६७४०), राजेश येवले (९८१९१४९६६५), आकाश पाटील (८६५२६१६५८०) किंवा गणेश जगताप (९८७०११६९६४) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.    
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नमुंमपा “कोव्हीड योध्द्यांचा” सन्मान