सुलेखनकार अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली रशियन विद्यार्थी गिरवताहेत देवनागरीचे धडे

नवी मुंबई : मराठी भाषा आणि लिपीचं सौंदर्य देशाबाहेर पोहचविण्यासाठी सुलेखनकार अच्युत पालव प्रयत्नशील असून सद्यस्थितीत रशियातील ४० विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन देवनागरी सुलेखनाचे धडे गिरवत आहेत. हे सर्व विद्यार्थी संस्कृतचे अभ्यासक असून पुढील वर्षात म्हणजेच २०२३ पर्यंत रशियात देवनागरी लिपीवर आधारित कलात्मक प्रदर्शन भरविण्यासाठी पालव हे रशियन विद्यार्थ्यांकडून काम करून घेत आहेत.  

देवनागरी शिकण्यासाठी त्यांना लागणारं लेखन साहित्य म्हणजे बोरू, देवनागरी कट केलेला पेन आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं पालवांचं बीटूसी देवनागरी हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला पाठविलं आहे. स्वर, व्यंजन, बाराखडी, चिन्ह, जोडाक्षरं आणि शेवटी परिच्छेद लेखन असा सराव झाल्यानंतर पुढे मग प्रदर्शनाची तयारी... हा क्लास ? या सत्रामध्ये विभागला असून रविवारचा नुकताच तिसरा क्लास संपला. मुलांचा काम करण्याचा उत्साह पाहून अच्युत पालव यांनी समाधान व्यक्त केले.  

आपली लिपी परदेशी मुलं करतात तेव्हा ते करताना पाहण्याचा आनंद शिकविण्याइतकाच असतो अशी भावना अच्युत पालव यांनी यावेळी व्यक्त केली.  २००८ साली रशियात सेंट पिटर्सबर्ग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी सेमिनारमध्ये प्रदर्शन व प्रात्यक्षिकासाठी अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच २०१० साली मुंबईतल्या रशियन सेंटरच्या पुढाकाराने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या विद्यार्थ्यांचे देवनागरी लिपीवर आधारित प्रदर्शन आयोजित केले होते. लवकरच रशियन विद्यार्थ्यांचा देवनागरी लिपीतला कलाविष्कार पाहावयास मिळेल अशी आशा पालव यांनी व्यक्त केली.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण कार्यक्रम