नेहा गवळी यांचा नारी रत्न पुरस्काराने गौरव
नवी मुंबई ः लेक माहेरचा कट्टा या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने त्यांच्या चौथ्या वर्धापन दिनी ‘लेक माहेरची कट्टा नारी रत्न पुरस्कार-२०२२’चे आयोजन नुकतेच ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्य प्रशासन आदि क्षेत्रात विशेष उल्लेखनीय सेवा, कामगिरी बजावणाऱ्या ठाणे मुंबई, नवी मुंबई, पुणे ,पिंपरी चिंचवड, जळगांव या विभागातील महिलांचा पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधिकारी प्रियतमा मुंढे, जोतिष तज्ञ राहुल मालगावकर, पत्रकार योगेश महाजन, प्राचार्य डॉ. साहेबराव ओव्हाळ, हुंडाई कंपनीच्या ममता त्यागी, संस्थेच्या संस्थापिका सारिका ढोणे, प्रमोद ढोणे, उद्योजक अनिल पाटील, आदि उपस्थित होते.
सदर सन्मान सोहळ्यात विद्यादीप विद्यालय कोपरखैरणे येथील मुख्याध्यापिका, ‘स्वाभिमानी शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य’च्या महिला प्रमुख तथा शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निमंत्रक नेहा मारुती गवळी यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणी सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘लेक माहेरची कट्टा नारी रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
नेहा गवळी यांनी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटना महिला राज्य प्रमुख, शिक्षक सेना नवी मुंबई महिला आघाडी प्रमुख ,महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघ राज्य महिला प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करताना महाराष्ट्रातील विनाअनुदानित, अंशत अनुदानित, अघोषित शिक्षक बांधवांसाठी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घऊन आमरण उपोषण देखील केले आहे. नुकतेच शिक्षक समन्वय संघाच्या वतीने त्यांनी शिक्षक बंधू-भगिनीं साठी सत्तावन दिवसाचे आंदोलन यशस्वीरित्या राबवून अनुदानचा टप्पा मिळण्यात उल्लेखनीय आणि यशस्वी नेतृत्व केले आहे. तर आता पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल पासून विना अनुदानित शिक्षक बंधू भगिनींसाठी महायल्गार आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यापूर्वी नेहा गवळी यांना मुंबई, ठाणे, पालघर जिल्हा मधील विविध संस्थांमार्फत आदर्श शिक्षिका, ज्ञानज्योती कार्यशील मुख्याध्यापिका म्हणून गौरविण्यात आले आहे. तर शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तसेच एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय विशेष सेवा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान, सदर नारी रत्न पुरस्काराने नेहा गवळी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यादीप शिक्षण संस्थाचे अध्यक्ष, सचिव, शाळेतील पालक वर्ग आणि परिसरातील ग्रामस्थ यांनी देखील सदर पुरस्काराबद्दल सौ. ोहा गवळी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.