डिनोटीफाईड ‘नवी मुंबई सेझ’ने बुजवली भेंडखळ पाणथळ

नवी मुंबई ः भेंडखळ येथील सुमारे १६५ एकर पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याचे आदेश उच्च न्यायालय नियुक्त पाणथळ समितीने देऊनही डिनोटीफायईड ‘नवी मुंबई सेझ’ने विकासाच्या नावाखाली पाणथळ पूर्णपणे बुजवून टाकल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

आम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असून जैवविविधतेच्या बाबतीत समृध्द असलेल्या आणखी एका क्षेत्राचा विनाश पायाभूत विकासाच्या नावावर सुरु आहे. ते पाहताना खेद वाटतो, अशी खंत ‘नाटकनेक्ट फाऊंडेशन’चे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली. कुमार यांनी या क्षेत्राचे संवर्धन करण्याची विनंती राज्य शासन आणि उच्च न्यायालय नियुक्त समितीकडे केली आहे.

फेब्रुवारी २०१९ दरम्यान नवी मुंबई सेझ डिनोटीफाय करण्यात आला. मात्र, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करण्याचे प्रयत्न सुरुच राहिल्याचे नाटकनेक्ट कडून अधोरेखित करण्यात आले. फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांचा काळ होता. तेव्हापासून पाणथळीच्या विनाशाची सुरुवात झाली. या क्षेत्रात राडारोडा टाकण्याचे प्रकार घडू लागल्याने त्याविषयीची तक्रार पर्यावरणस्नेही नाटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठानने केली. त्यानंतर उच्च न्यायालय नियुक्त समितीच्या आदेशावरूरुन सदर प्रकाराला अटकाव करण्यात आला.  

त्याचप्रमाणे डिसेंबर २०१९ मध्ये या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सिडको, रायगड जिल्हा प्रशासन आणि नवी मुंबई सेझला दिले. जानेवारी २०२० र्पयंत जवळपास ६० टक्के पेक्षा अधिक बुजवण्यात आलेल्या पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, आपण सदर क्षेत्र एका बड्या कंपनीला सुपूर्द केल्याची माहिती देत ‘सिडको’ने हात वर केल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले. यावेळी ‘सिडको’ने कंपनीचे नावही नमूद केल्याचे कुमार म्हणाले.  

सदर संपूर्ण प्रकाराचा तपास महसूल-वन विभागांकडून एकत्रित करण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाने अनोळखी नवी मुंबई सेझ अधिकाऱ्यांच्या विरुध्द एफआयआरही नाेंदवण्यात आली.

नवी मुंबईतील बेलपाडा, पाणजे या एनआरआय-टीएस चाणक्यच्या जुळ्या पाणथळीसह भेंडखळ आणि ईशान्य मुंबईचे भांडूप क्षेत्र मिळून ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याचा (टीसीएफएस) भाग तयार होतो, असे सॅटेलाईट वेटलँड मॅनेजमेंट प्लानमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीकडे बी. एन. कुमार यांनी लक्ष वेधले. सदरचा आराखडा इतर कोणी नव्हे तर राज्य वन विभागाच्या वतीने तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याकडून रामसर पाणथळ दर्जाचा हिरीरीने प्रचार करण्यात येतो आहे. पाणथळ क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नाचा सदर भाग असून या उपक्रमात भारतही सक्रिय आहे. तसेच स्टेट मँग्रोव्ह फाऊंडेशनने या सहा पाणथळींचे संवर्धन करण्यात स्वारस्य दाखवले आहे. मात्र, या क्षेत्राच्या पाणथळ दर्जाला ‘सिडको’च्या कृत्यामुळे गालबोट लागत असून ते दुर्दैवी असल्याचे ‘श्री एकविरा आई प्रतिष्ठान’चे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले.  

दरम्यान, बी. एन. कुमार आणि नंदकुमार पवार यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून पर्यावरणाच्या विनाशकारी कृत्यांची माहिती बऱ्याचदा दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवीमुंबईकरांसाठी पोस्टाची 24 तास सेवा