अनधिकृत कॅम्प मॅक्स हॉटेल रिसॉर्ट वन विभागाने केले जमिनदोस्त
नवी मुंबई : अलिबाग वन विभागातील खालापुर वनक्षेत्रातील मौजे कलोते मोकाशी येथील 1.9 हेक्टर जागेवर अतिक्रमण करुन त्याठिकाणी अनधिकृतरित्या सुरु केलेल्या कॅम्प मॅक्स या अनधिकृत हॉटेल रेस्टारंट-रिसॉर्टवर वन विभागाने शनिवारी धडक कारवाई करुन सदरचे अनधिकृत हॉटेल व रिसॉर्ट जमिनदोस्त केले. या कारवाईनंतर वन विभागाने सदरचे अनधिकृत हॉटेल थाटणा-या जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
या प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल याने अलिबाग वनविभागातील खालापुर वनक्षेत्रातील मौजे कलोते मोकाशी गावालगतच्या जागेवर अतिक्रमण करुन त्याठिकाणी कॅम्प मॅक्स नावाने अनधिकृत भव्य हॉटेल रेस्टारंट-बार रिसॉर्ट सुरु केले होते. तसेच त्याठिकाणी त्याने पॅगोडा, स्वंयपाक घर, सामान कक्ष, बांबुच्या झोपडया, 22 टेंट, शौचालय-बाथरुम, ओपन थिएटर, अंतर्गत रस्ते, बॅडमिंटन, टेनिस कोर्ट, शुक्ल कोर्ट, वॉश रुम, रोपे लागवड, लॉन, गार्डन आदी तयार करुन त्याठिकाणी बेकायदेशीर हॉटेल व्यावसाय सुरु केला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाकडुन सदर प्रकरणाची पुर्ण चौकशी करुन सदर प्रकरण पनवेल येथील प्राधीकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडे पुढील चौकशीसाठी सोपविण्यात आले होते.
त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक यांनी सदर प्रकरणाची रितसर कार्यवाही पुर्ण करुन वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱया जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल याला त्याने अतिक्रमण केलेल्या जमीनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी पुराव्यासह त्याचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली होती. मात्र सबरवाल याला कोणत्याही प्रकारे कलोते मोकाशी येथील अतिक्रमण केलेली जागा त्याच्या मालकीची आहे, हे सिद्ध करता आले नाही. तसेच त्याबाबतचे त्याने कोणते पुरावे देखील सादर केले नाहीत. त्यामुळे सबरवाल याने मौजे कलोते मोकाशी येथील संरक्षीत वन गट नंबर 363 च्या क्षेत्रामध्ये 1.9 हेक्टर जागेवर अतिक्रमण करुन अनधीकृत हॉटेल थाटल्याचे सिद्ध झाल्याने पनवेलचे सहाय्यक वनसंरक्षक यांनी सबरवाल याला त्याने बेकायदेशीररीत्या उभारलेले हॉटेल व इतर वास्तु 7 दिवसात स्वत:हुन मोकळे करण्याचे आदेश दिले होते.
मात्र सबरवाल याने 7 दिवसामध्ये सदरचे अतिक्रमण न काढल्याने शनिवारी अलिबाग येथील उप वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील सहाय्यक वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत पनवेल उप विभागातील खालापुर वनक्षेत्रपाल, कर्जत, पनवेल, उरण व माथेरान विभागील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागाच्या मदतीने सबरवाल याने 1.9 हेक्टर जागेवर उभारलेले भव्य असे हॉटेल-रिसॉर्ट जमिनदोस्त करण्यात आले. सबरवाल याने वन विभागाची जागा बळकावुन त्यावर बेकायदेशीरीत्या हॉटेल व्यावसाय सुरु केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.