खारघर : अधिराज हे नावाजलेले बिल्डर असल्यामुळे घरे वेळेत देतील म्हणून घरांची नोंदणी केली. नोंदणी करून दहा वर्षे झाली. दर महिन्याला घरांचे हप्ते जात आहेत. मात्र इमारती कुठे आहे. किती टक्के बांधकाम झाले, घरे कधी देणार आहे. या संदर्भात विचारणा करूनही अधिराज बिल्डर कडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदनिका धारकांनी बिल्डरच्या विरोधात घोषणा देवून निषेध केला.
तळोजा परिसरातील खुटारी गावालगत असलेल्या एमएमआरडीए जागेवर अधिराज बिल्डरकडून पंचेचाळीस ते पन्नास माळ्याची टॉवर उभारण्यात येणार असून इमारतीमध्ये प्रशस्त घरे, स्विमिंग पूल, व्यायाम शाळा, योगासाठी विशेष जागा, मार्केट, मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान आणि इमारती पासून खारघर रेल्वे स्थानक लगत बस सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची जाहिरात दोन हजार दहा साली प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि मुंबई आदी परिसरातील नागरिकांनी अधिराज हे नावाजलेले बिल्डर असल्यामुळे तसेच इमारती पासून काही अंतरावर नवी मुंबई मेट्रोचा अमनदूत मेट्रो स्थानक तसेच हाकेच्या अंतरावर पनवेल मुंब्रा महामार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घरांची नोंदणी केली. दोन वर्षात घरे उपलब्ध करून दिले जातील असे सांगण्यात आले. मात्र नोंदणी केलेले सदनिका धारक कार्यालयात जावून विचारणा केल्यास लवकरच घरे दिले जातील असे सांगितले जात असे, आज ना उद्या घरे मिळतील असे या आशेवर घरांची नोंदणी केलेल्या नागरिकांनी एकत्र येवून रविवारी 3 एप्रिल रोजी खुटारी गावालगत अधिराज बिल्डरच्या असलेल्या कार्यालयात अधिराज बिल्डर हाय हाय अश्या प्रकारची घोषणा देवून निषेध केला. मात्र यावेळी कार्यालायात वरिष्ठ दर्जाचे एकही अधिकारी उपस्थित नव्हते. जो पर्यंत योग्य प्रकारे माहिती दिली जात नाही. तो पर्यंत घरी माघारी जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. या वेळी लहान मुलासह महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.