केंद्र सरकारच्या महागाईचा निषेध करीत युवासेनेने घातले दुचाकीचे श्राद्ध

 खारघर:  केंद्र सरकारच्या महागाई विरोधात खारघर येथे युवासेनेच्या पनवेल विधानसभेच्या वतीने  युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल आणि डिझेल महाग झाले असले तरी घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी युवतींसह महिलावर्गही या आंदोलनात सहभागी झाले होते. 
 
    देशात भाजपची सत्ता येण्यापूर्वी गॅस सिलेंडर आणि पेट्रोलचे भाव  कमी केले जातील असे आश्वासन देण्यात आले होते.   मात्र सत्ता हाती येताच हे दर गगनाला भिडणारे असे करण्यात आले. जवळपास चारशे रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर साठी एक हजार रुपये मोजावे लागत आहे. देशातील सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्यावतीने सर्वसामान्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून केंद्रीय दरवाढीचा निषेध करीत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडर आणि दुचाकींवर कफन  पुष्पहार अर्पण करून त्यांचे अंतिम विधी करून श्राद्ध घालून  महागाईचा निषेध करण्यात आला. दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेने जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. युवासेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुण सरदेसाई ह्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांच्यासह समन्वयक नितीन पाटील, पनवेल ग्रामीण अधिकारी केवल माळी, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, युवतीसेना जिल्हा अधिकारी योगीता माने पाटील आदींसह युवासैनिक, युवतीसेना मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संतत्प सदनिका धारकांचा बिल्डरच्या विरोधात घोषणाबाजी